ओबीसी आरक्षण : 18 जुलै रोजी सरन्यायाधीश चंद्रचूड घेणार सुनावणी

ओबीसी आरक्षण : 18 जुलै रोजी सरन्यायाधीश चंद्रचूड घेणार सुनावणी
-ऑगस्ट 2022 पासून सुप्रीम कोर्टात प्रकरण

प्रतिनिधी
नवी दिल्ली : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. मात्र, आजसुद्धा सुनावणी लांबणीवर टाकण्यात आली आहे. आता पुढील 18 जुलैरोजी होणार आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यासमोर ही सुनावणी होणार आहे.

विशेष म्हणजे अवघ्या राज्याचे लक्ष लागलेल्या या प्रकरणाची गेल्या वर्षभरापासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झालेली नाही. त्यामुळे आता तरी पुढची सुनावणी 18 जुलैला होईल का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

-नेमके प्रकरण काय?

ओबीसी आरक्षणाचा पेच निर्माण झाल्याने राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. ओबीसी आरक्षणाची मुदत संपल्याने हे आरक्षण पुन्हा मिळावे, यासाठी राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. अशाच प्रकरणी मध्य प्रदेशनंतर महाराष्ट्रालाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षण ठेवण्यास सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदिल दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार 23 महानगरपालिका, 25 जिल्हा परिषदा आणि 207 नगरपालिका, पंचायत समित्यांमध्ये ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेता येणार आहे. मात्र, याव्यतिरिक्त 92 नगरपरिषदांमधील ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा अद्याप प्रलंबित आहे. या नगरपरिषदांमध्येही ओबीसी आरक्षण मिळावे, यासाठी राज्य सरकारने ऑगस्ट 2022ला सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

-ऑगस्टमध्ये याबाबतचा निकाल लागेल

राजकीयदृष्ट्या ही सुनावणी अत्यंत महत्त्वाची असली तरी वर्षभरापासून या प्रकरणावर सुनावणी होऊ शकलेली नाही. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयानं एप्रिल, मे महिन्यातील तारीख दिली होती. पण त्यादिवशीही सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी कोणतीही सुनावणी पार पडली नाही. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑगस्टमध्ये याबाबतचा निकाल लागेल, अशी शक्यता वर्तवली आहे. तसेच, येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये राज्यात पालिका निवडणुका होण्याची शक्यताही फडणवीसांनी वर्तवली आहे.

-सहा ते सात वर्षांपासून निवडणूक नाही

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्याने राज्यातील 23 महापालिकांसह काही जिल्हा परिषदा व नगरपालिकांचा कारभार प्रशासकांच्या हाती गेला आहे. विशेष म्हणजे सुप्रीम कोर्टाच्याच 2006 च्या आदेशानुसार, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कालावधी जास्तीत जास्त 6 महिने लांबवता येऊ शकतो. तरीही राज्यात गेल्या सहा ते सात वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकलेल्या नाहीत. त्यामुळे सर्वांचे लक्ष सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीकडे आहे.