उत्तर प्रदेशात होणार बसपा, सपात युती : आगामी निवडणुकीसाठी बांधणी

उत्तर प्रदेशात होणार बसपा, सपात युती : आगामी निवडणुकीसाठी बांधणी

-संभाव्य युतीची चर्चा

प्रतिनिधी
उत्तर प्रदेश : लोकसभेतील यशानंतर इंडिया आघाडीची देशभरातील ताकद वाढली आहे. तसेच आघाडीमधील पक्षांमधील एकजूट वाढल्याचं चित्र संसदेच्या अधिवेशनात पाहायला मिळालं. आता प्रसारमाध्यमांसमोरही त्यांच्यातली घट्ट मैत्री पाहायला मिळत आहे. इंडिया आघाडीतले पक्ष एकमेकांच्या बरोबरीने विविध मुद्दे मांडत आहेत. एकमेकांवरील टीकेला एकजुटीने उत्तर देत आहेत. अशातच उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीमधील संबंध सुधारू लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. भाजपा आमदाराने बसपा प्रमुख मायावतींवर केलेल्या टीकेनंतर सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी मायावतींचा बचाव केला आहे. त्यामुळे आता सपा व बसपाच्या संभाव्य युतीची चर्चा रंगू लागली आहे.

अखिलेश यादव यांनी बाजू मांडल्यानंतर मायावतींनी देखील लगेच त्यांचे आभार मानले. त्यानंतर अखिलेश यादव यांनी आणखी एक पाऊल टाकलं. ते म्हणाले, “दलित, वंचित आणि अल्पसंख्याकांसाठीच्या  युतीसाठी हे चांगली सुरुवात आहे”. अलीकडच्या काही महिन्यामध्ये सपा व बसपामधील प्रमुख नेते एकमेकांवर टीका-टिप्पणी करताना दिसलेले नाहीत. अखिलेश यादव म्हणाले, “पीडीए ही शोषित आणि वंचितांचं भविष्य आहे. आम्ही एकजूट आहोत आणि राहू”. अखिलेश यादव यांनी या वक्तव्याद्वारे सपा-बसपा युतीचे संकेत दिल्याची चर्चा होत आहे.

बसपाच्या प्रमुख मायावती यांनी इंडिया आघाडीत यावं यासाठी सपा व काँग्रेस दोन्ही पक्ष उत्सुक आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आधी देखील सपाने व काँग्रेसने मायावतींचं मन वळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तेव्हा मायावतींनी ‘एकला चलो रे’चा नारा दिला. मात्र, या निवडणुकीत उत्तर प्रदेशात मायावतींच्या पक्षाचा एकही उमेदवार निवडून आला नाही. दुसऱ्या बाजूला समाजवादी पार्टीने मात्र जोरदार पुनरागमन केलं. काँग्रेसनेही देशभरातील त्यांच्या खासदारांची संख्या जवळजवळ दुप्पट केली आहे. या गोष्टींचा विचार करता बसपा इंडिया आघाडीत सहभागी होऊ शकते. दरम्यान, एका सपा नेत्याने सांगितलं की “मायावती लोकसभा निवडणुकीच्या वेळी इंडिया आघाडीत येण्यास इच्छूक नव्हत्या. मात्र आता त्यांना कळून चुकलंय की भाजपाने त्यांच्या पक्षाचं किती नुकसान केलंय. त्यामुळे यावेळी आम्हाला वेगळ्या आशा आहेत”.

दरम्यान, युतीच्या चर्चा मायावतींनी नाकारल्या आहेत. यापूर्वी त्यांनी सपा व काँग्रेसला आरक्षणविरोधी पक्ष म्हटलं होतं. त्यामुळे मायावती या युतीचा किती गांभीर्याने विचार करतील याबाबत अनेकांच्या मनात शंका आहे. मात्र राज्यातली परिस्थिती पूर्वीसारखी राहिलेली नाही. भाजपाला टक्कर देण्यासाठी वेगळी पावलं उचलणं आवश्यक आहे.