अमरावतीत राजकीय घडामोडी : रवी राणा यांनी घेतली चंद्रकांतदादांची भेट

अमरावतीत राजकीय घडामोडी : रवी राणा यांनी घेतली चंद्रकांतदादांची भेट

-लोकसभा निवडणुकीवर भाष्य

प्रतिनिधी
अमरावती : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची अमरावतीत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठीकासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री चंद्रकांत पाटील हे आज अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत. चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित ही बैठक पार पडत आहे. या बैठकीआधी काही महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत.

चंद्रकांत पाटील अमरावतीत आले असता आमदार रवी राणा त्यांच्या भेटीसाठी आले. अमरावतीत शासकीय विश्रामगृह येथे रवी राणा यांनी जावून चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार देण्यासाठी ठाम आहे. त्यामुळे या बैठकीत याबाबत चर्चा होणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावतीच्या भाजपच्या संयोजक कमिटीची आज बैठक आयोजित करण्यात आलीय. अमरावतीच्या शासकीय विश्रामगृह येथे ही बैठक पार पडत आहे. या बैठकीआधी आमदार रवी राणा यांनी शासकीय विश्रामगृह येथे येऊन मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. विकासकामांच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी चंद्रकांत पाटील यांची भेट घेल्याचं रवी राणा यांनी सांगितलं आहे.

दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून खासदार नवनीत राणा या भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढतील अशी चर्चा सर्वत्र सुरु आहे. आमदार रवी राणा यांनी चंद्रकांत पाटील यांच्या भेटीनंतर खासदार नवनीत राणा यांच्या लोकसभा उमेदवारीबाबत प्रतिक्रिया दिली. “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे नवनीत राणा यांचा लोकसभा उमेदवारीबाबतचा निर्णय घेतील. त्यांचा निर्णय आम्हाला मान्य असेल”, अशी प्रतिक्रिया रवी राणा यांनी दिली आहे.