अमरावतीत काय चाललंय; अपक्ष उमेदवारावर अज्ञाताचा हल्ला

अमरावतीत काय चाललंय; अपक्ष उमेदवारावर अज्ञाताचा हल्ला

-दोन‎ दिवसात पाठिंबा न दिल्यास जीवे‎ मारू

प्रतिनिधी
अमरावती : अमरावती पदवीधर निवडणुकीची ‎ ‎रणधुमाळी सुरू झाली असून ३० ‎जानेवारीला मतदान होणार आहे.‎ दरम्यान, याच निवडणुकीत अपक्ष ‎उमेदवार असलेले विकेश गवाले‎ यांच्यावर सोमवारी (दि. २३) मोर्शी‎ मार्गावरील माहुली जहागिरच्या पुढे‎ अज्ञात चौघांनी हल्ला केला. दोन‎ दिवसात पाठींबा न दिल्यास जीवे‎ मारु, अशी धमकीही यावेळी‎ हल्लेखोरांनी दिली. मात्र पाठींबा‎ नेमका कोणाला द्यायचा याबाबत‎ हल्लेखोरांनी सांगितले नसल्याचे‎ गवाले यांनी सांगितले आहे.‎ विकेश गोकुलराव गवाले (३२, रा.‎ वृंदावन अपार्टमेंट, रहाटगाव,‎ अमरावती) यांनी सांगितल्याप्रमाणे,‎ सोमवारी सकाळी प्रचारासाठी मोर्शी‎ भागात कारने एकटाच जात होतो.‎ त्यावेळी माहुली जहागिरपासून एक‎ किलोमीटर अंतर पुढे गेल्यानंतर मला‎ हात दाखवून थांबवण्यात आले.‎ त्यावेळी मला वाटले आपले‎ परिचितच कोणी आहे, म्हणून मी कार‎ थांबवून कारमधून खाली उतरलो.‎ खाली उतरताच चौघांपैकी एकाने‎ ‎ मला छातीवर‎ ‎ बुक्की मारली.‎

त्यानंतर अन्य‎ ‎तिघांनी सुध्दा‎ ‎ हाता-पायावर‎ ‎ मारहाण केली.‎ हल्लेखोरांकडे चाकू सुध्दा होता,‎ चाकूने सुध्दा वार केला. तसेच त्यांनी‎ धमकी दिली की, दोन दिवसांत‎ पाठींबा न दिल्यास जीवे मारुन टाकू,‎ मात्र कोणाला पाठींबा द्यायचा हे त्यांनी‎ सांगितले नाही. मात्र आपण‎ कोणालाही घाबरणार नसून मागे‎ येणार नाही, निवडणूक लढवणारच,‎ असे गवाले यांनी ‘दिव्य मराठी’ला‎ सांगितले आहे.‎ दरम्यान, गवाले यांनी या‎ प्रकरणाची माहुली पोलिसांत तक्रार‎ दिली असून पोलिसांनी अज्ञात‎ हल्लेखोराविरुध्द गुन्हा दाखल केला‎ आहे. गवाले यांच्यावर पाठींबा‎ देण्यासाठी कोणी हल्ला केला.‎ हल्लेखोरांनी पाठींबा कोणाला‎ द्यायचा ते का सांगितले नाही, असे‎ अनेक प्रश्न पोलिसांसमोर उभे झाले‎ असून पोलिसांनी आरोपी‎ पकडल्यानंतरच या बाबींचा उलगडा‎ होणार आहे.