अजितदादांचा भाजपा प्रवेश: हा आमदार म्हणतो मग पक्षात राहिले काय?
-आमदार माणिकराव कोकाटे यांचे भाष्य
प्रतिनिधी
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर आपले मत व्यक्त केले आहे. माणिकराव कोकाटे म्हणाले की, अजित पवार जर राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडले तर पक्षात काहीच शिल्लक राहणार नाही. अजित पवार सोडले तर आमदारांनी विश्वास ठेवावा असा कोणता नेता सक्षम नाही. पण संभाव्य वक्तव्य करणे मला योग्य वाटत नाही. अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोंडी होते असे म्हणता येणार नाही. पक्षाचे सर्व निर्णय तेच घेतात, असे त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे म्हणाले की, उगाच अंदाज व्यक्त करत नाही, मी अंदाजावर भाकीत करत नाही. जशी परिस्थिती निर्माण होईल तसे निर्णय घेण्यात येतील. जो निर्णय होईल त्याला आम्ही बांधील आहोत. सरकार पडणार नाही हे सत्यच आहे, 16 आमदार अपात्र ठरल्याने सरकार पडणार नाही, असे कोकाटे यांनी म्हटले आहे.
–महाराष्ट्रातून भाजपला 10 ते 15 जागा
–उद्धव ठाकरेंना सर्वत्र सहानुभूती
माणिकराव कोकाटे म्हणाले की, ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसला चांगली आवक आहे. उद्धव ठाकरेंना सहानुभूती आहेच, त्यांच्या पक्षाची शहरी भागात चांगली पकड आहे. पण त्यांना शहरी भागात शिंदे सेनेमुळे विभाजन आहे. तसे राष्ट्रवादीला कुठेही नाही म्हणून भाजपकडूनपर्याय तपासले जात असतील.
एकीकडे विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याबद्दलच्या बातम्यांमुळे राजकीय वातावरण सध्या तापले आहे. यातच अण्णा बनसोड यांनी केलेले वक्तव्य आणि काही दिवसांपूर्वीची त्यांची फेसबूक पोस्ट पुन्हा चर्चेत आली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे बारामतीत असताना मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांसोबतच्या बैठकीचा हवाला देऊन पवारांच्या कुटुंबावर दबाव असल्याचे म्हटले होते.


