सडेतोड टीका : पवारांच्या पक्षात काही नेते मंत्रिपदासाठी हपापलेले

सडेतोड टीका : पवारांच्या पक्षात काही नेते मंत्रिपदासाठी हपापलेले

-दैनिक सामनातून विलीणीकरणावरून टीकेचे बाण

प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. पूर्वी शरद पवार गटाकडून होणारी विलीनीकरणाची चर्चा आता अजित पवार गटाकडून होत आहे. एकेकाळी विलीनीकरणाची चर्चा झालीच नाही, असे सांगणारे अजित पवार गटाचे नेते आता पूर्वी झालेल्या बैठकांचा दाखला देत आहेत. मात्र या विषयात ठोस असे काही होताना दिसले नाही. यावरच सामना दैनिकातून विलीनीकरणावर भाष्य करण्यात आले असून “चला विलीनीकरण विलीनीकरण खेळू या” असा अग्रलेख लिहिण्यात आला आहे. ज्यात शरद पवारांच्या पक्षात मंत्रीपदासाठी काही लोक हपापलेले आहेत, असा आरोप करण्यात आला आहे.

“महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या दोन गटात नाट्य प्रयोगही सुरू आहे आणि मैदानी खेळही चालला आहे. नाट्यप्रयोग म्हणावा तसा रंगत नाही आणि खेळ म्हणावा तर खेळाचे नियम, स्वरूप वगैरेंबाबत संभ्रम आहे. कधी वाटते हा कबड्डीप्रमाणे खेळ आहे. एकमेकांचे पाय खेचण्याचा. कधी हा आबाधुबीचा, तर कधी लपाछपीचा खेळ वाटतो, पण नाटक व खेळ यांचे मिश्रण असलेल्या या खेळामुळे मराठी माणसांचे चांगलेच मनोरंजन सुरू आहे”, असे भाष्य विलीनीकरणावर करण्यात आले आहे.

अजित पवार व शरद पवार यांच्यात विलीनीकरणावर कधीच चर्चा झाली नाही, असे सांगणारे तटकरे वगैरे लोक आता पलटी मारून सांगत आहेत की, अजित पवार असते तर विलीनीकरण घडले असते. अजित पवार विलीनीकरणासाठी प्रयत्नशील होते, हे भाष्य बनचुकेपणाचे आहे, असाही आरोप अग्रलेखात करण्यात आला.

अजित पवार आणि त्यांचे समर्थक भाजपा आणि सत्तेत सामील झाले, पण तिथे अजित पवारांची घुसमट होऊ लागली, असाही दावा अग्रलेखात करण्यात आला. “भाजपमधले वातावरण हे स्वाभिमानी माणसाला गुदमरून मारणारे आहे. त्यामुळे सत्तेत असूनही अजित पवारांचा कोंडमारा सुरू झाला व त्यांनी मागे वळण्याचे ठरवले. अर्थात ही माघारी पटेल, तटकरे यांना मान्य नसावी. त्यामुळे ते विलीनीकरणात अडथळे आणत राहिले. सत्तेतल्या राष्ट्रवादीची घडी आता विस्कटली. सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्या नेतृत्वाखाली पटेल, तटकरे यांना काम करावे लागत आहे. पटेल, तटकरेंचे नेते ‘पार्थ’ बनल्याने त्यांची घुसमट सुरू झाली आहे”, असाही दावा करण्यात आला.

सामनाच्या अग्रलेखात विलीनीकरण झाले असून कोणते निकष असू शकतात, यावरही भाष्य करण्यात आले आहे. “शरद पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष व सुनेत्रा पवार कार्याध्यक्ष या ‘पॅकेज’वर एकमत झाले आहे. दुसरे पॅकेज असे सांगितले जाते की, जयंत पाटील, आव्हाड वगैरे दोन मंत्री महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये असतील व सुप्रिया सुळे केंद्रात जातील. विलीनीकरणाच्या खेळात हे अफवा आणि बातम्यांचे चेंडू इकडून तिकडे भिरकावले जात आहेत. शरद पवार यांचा पक्ष महाविकास आघाडी आणि इंडिया ब्लॉकमध्ये असताना अशा चर्चा होणे हे शरद पवारांच्या प्रतिमेस मारक आहे.

अमित शहा पुरस्कृत राष्ट्रवादी गटाला वैचारिक आगापीछा नाही व ते सगळे एकजात बाजारबुणगे आहेत. हसन मुश्रीफसारख्या बाजारबुणग्यांचे गोकुळमधले खेळ पाहता अशा बाजारबुणग्यांबरोबर शरद पवारांनी चर्चाही करू नये, असा सल्लाही अग्रलेखातून देण्यात आला आहे.

-सुप्रिया सुळेंकडून अग्रलेखावर भाष्य

दरम्यान शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना सामनाच्या अग्रलेखासंदर्भात प्रश्न विचारला गेला. त्यावर त्या म्हणाल्या की, संजय राऊत माझे मोठे बंधू आहेत. ते मला या नात्याने सांगू शकतात. तसेच ते एका दैनिकाचे संपादक आहेत. या नात्याने त्यांची काही भूमिका असते. त्याचे स्वागत केले गेले पाहिजे. माझ्याविरोधात जरी अग्रलेख लिहिला तरी लोकशाही आहे, मी त्याचे स्वागतच करेन.