राजकीय स्थैर्यासाठी या पक्षाची जुळवाजुळव : दिले सत्तेचे निमंत्रण!
-दिल्लीत मोठ्या घडामोडीना वेग
प्रतिनिधी
नवी दिल्ली : भविष्यातील मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकाच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे केंद्रीय नेतृत्व प्रादेशिक पक्षांशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नात आहे. महाराष्ट्रात शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाशी वाढणारी भाजपाची जवळीक याच रणनीतीचा भाग मानली जात आहे. दीर्घ राजकीय अनुभव आणि सर्वपक्षीय सलोखा असलेले शरद पवार महत्त्वपूर्ण विधेयकांसाठी उपयुक्त ठरू शकतात, अशी भाजपाची भूमिका दिसत असल्याची माहिती द इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तात देण्यात आली आहे.
पुण्यातील रूबी हॉल रुग्णालयात दाखल असताना पंतप्रधान मोदींनी शरद पवारांना केलेला फोन आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची राष्ट्रवादीच्या (अजित पवार) शिष्टमंडळाने दिल्लीत घेतलेली भेट या ताज्या घडामोडी याच पार्श्वभूमीवर पाहिल्या जात आहेत.
-काँग्रेसला रोखण्याची t
काँग्रेस आक्रमक भूमिका घेत असताना प्रादेशिक पक्षांचे महत्त्व वाढल्याचे भाजपाचे मत आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चेला पुन्हा वेग आला आहे. मात्र यावर अंतिम निर्णय शरद पवार यांचाच असेल, याची जाणीव भाजपाला आहे.
राजकारणात कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी नसते. मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण ही विधेयके केंद्राच्या अजेंड्यावर अग्रस्थानी आहेत. यासाठी केंद्राला मतांची गरज भासणार आहे. राजकारणातील विरोधकांकडून मुद्द्यांवर आधारित पाठिंबा मिळवणे ही नवी बाब नाही. राष्ट्रवादीच्या हिताला धक्का लागणार नाही, हाच स्पष्ट संदेश भाजपाने दिला आहे,” असे एका ज्येष्ठ भाजप नेत्याने द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना नमूद केले.
लोकसभेत आठ खासदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची भूमिका महत्त्वाची ठरते. महाराष्ट्रात काँग्रेसच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी प्रादेशिक पक्षांना बळ देणे ही भाजपाची राजकीय अपरिहार्यता बनली आहे. संसदेत दोन तृतीयांश बहुमताची जुळवाजुळव करण्यासाठी विचारधारा बाजूला ठेवून सर्व पक्षांशी संवाद साधण्याच्या सूचना केंद्राने दिल्या आहेत. यापूर्वीच्या विशेष अधिवेशनात लोकसभेत विधेयकाच्या बाजूने २९८, तर विरोधात २३० मते पडल्याने केंद्राला आवश्यक संख्याबळ गाठता आले नव्हते.विलीनीकरणाबाबत भाजपाचे म्हणणे आहे की, राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांनीच याबाबत अंतिम निर्णय घ्यायचा आहे.
युतीची गणिते बाजूला ठेवली तरी पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांच्यातील व्यक्तिगत संबंध नेहमीच सलोख्याचे राहिले आहेत. निवडणुकीच्या मैदानात परस्परांवर जोरदार राजकीय हल्ले झाले तरी या दोन नेत्यांमधील संवाद कायम राहिला आहे. त्यामुळे पवारांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मोदींनी केलेला फोन भाजपाच्या वर्तुळात अनपेक्षित मानला जात नाही. दरम्यान बारामतीतील ‘प्रेरणा स्थळा’च्या उद्घाटनासाठी मोदींचा ३ नोव्हेंबरचा नियोजित दौरा पुढे ढकलला असून, आता १६ नोव्हेंबरच्या तारखेचा विचार सुरू असल्याचे युगेंद्र पवार यांनी सूचित केले आहे.
-सुप्रिया सुळेंच्या उल्लेखाची चर्चा
पंतप्रधान मोदींनी शरद पवारांना प्रकृतीची काळजी घेण्याचा सल्ला देताना, “मी आणि सुप्रिया सुळे देश सांभाळू,” असे म्हटल्याचा दावा पवारांचे निकटवर्तीय विठ्ठल मणियार यांनी केला होता. या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली. सुप्रिया सुळे या २००६ पासून राजकारणात सक्रिय असून २००९ पासून लोकसभेत पक्षाचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्या पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षा असल्याने त्यांचा उल्लेख स्वाभाविक असल्याचे भाजपाच्या गोटातून सांगण्यात आले.
विधान परिषद निवडणुकीचा धक्का आणि अस्वस्थता
पुणे आणि छत्रपती संभाजीनगर या दोन्ही विधान परिषद जागांवर शरद पवार यांच्या पक्षाने मिळवलेला विजय भाजपासाठी धक्का मानला जात आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघासह या निवडणुकांमध्ये पवारांनी रणनीती आखून भाजपाचे गणित बिघडवल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान मुंबईतील रुग्णालयात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पवारांची घेतलेली भेट, त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली विचारपूस यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. त्यातच विलीनीकरणाच्या मुद्द्यावर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या बदललेल्या सुराने उत्सुकता वाढवली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर विलीनीकरणाची चर्चा फेटाळणाऱ्या तटकरेंनी आता तशी शक्यता गृहीत धरून वक्तव्ये केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
२०२९ च्या निवडणुका लक्षात घेता, भविष्यातील राजकीय स्थैर्यासाठी ही जुळवाजुळव सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत.


