या काँग्रेस नेत्यावर कारवाईचे संकेत : रामलीला मैदानावरील सभेला दांडी
-६० पदाधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
प्रतिनिधी
नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात इंडिया आघाडीने गेल्या रविवारी दिल्लीतील रामलीला मैदानावर जोरदार शक्तीप्रदर्शन केले. या सभेला संबोधित करताना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर टीकेची तोफ डागली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाही त्यांनी लक्ष्य केले. या सभेला विरोधी पक्षांतील अनेक नेत्यांची उपस्थिती असली तरी युवक काँग्रेसचे काही पदाधिकारी गैरहजर राहिल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणी काँग्रेसने कारवाईचा बडगा उगारला असून सभेकडे पाठ फिरवणाऱ्या तब्बल ६० पदाधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
रामलीला मैदानावरील महासभा ही ‘इंडिया’ आघाडीच्या घटक पक्षांसाठी अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात होती. असे असतानाही मध्य प्रदेशातील युवक काँग्रेसचे काही पदाधिकारी सभेला गैरहजर राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. याप्रकरणी संघटनात्मक शिस्तीचा भंग झाल्याचे म्हणत युवक काँग्रेसने आपल्या ६० प्रभावशाली पदाधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. त्यामध्ये ९ जिल्हाध्यक्ष, ५ उपाध्यक्ष, १४ सरचिटणीस आणि ३२ सचिवांचा समावेश आहे. ३ नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार हे निलंबन तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आले असून, पुढील आदेश येईपर्यंत ते कायम राहणार आहे.
द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना युवक काँग्रेसच्या निलंबित पदाधिकाऱ्यांनी सभेला अनुपस्थित राहण्यामागे वैयक्तिक कारणे सांगितली. तसेच, कारवाई करण्यापूर्वी पक्षाने आपल्याकडून स्पष्टीकरण मागवायला हवे होते, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. मध्य प्रदेशातील युवक काँग्रेसचे मैहर जिल्हाध्यक्ष सौरभ शर्मा यांनी मोठ्या भावाला मुलगा झाल्यामुळे आपण सभेला उपस्थित राहू शकलो नसल्याचे सांगितले. ते म्हणाले की, माझ्या मोठ्या भावाला मुलगा झाल्यामुळे घरी कार्यक्रम होता. याबाबत मी प्रदेशाध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांना माहिती दिली होती. तसेच त्यांना कार्यक्रमाचे निमंत्रणही दिले होते. त्यानंतर मला या सभेबाबत कळवण्यात आले. तब्बल १२ वर्षांनंतर माझ्या भावाला मुलगा झाला होता. त्यामुळे हा कार्यक्रम सोडून मला सभेला जाणे शक्य नव्हते.
शर्मा पुढे म्हणाले की, आजवर मी संघटनेच्या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहिलो आहे. कार्यक्रमांना नियमित हजेरी लावणाऱ्या प्रमुख जिल्हाध्यक्षांपैकी मी एक आहे. अनेक वर्षांपासून युवक काँग्रेसमध्ये काम करीत आहे. निलंबनाची कारवाई करण्यापूर्वी नेतृत्वाने कारणे दाखवा नोटीस बजावून संबंधित पदाधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण मागवायला हवे होते. ज्यांच्याकडे अनुपस्थित राहण्याचे कोणतेही ठोस कारण नव्हते, त्यांच्यावर कारवाई करायला हवी. मात्र, ज्यांच्यासमोर काही अडचणी होत्या, त्यांना पक्षाने निलंबित करायला नको होते. दुसरीकडे युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहित राजौरिया यांनी काकांचे निधन झाल्यामुळे आपण सभेला जाऊ शकलो नसल्याचे सांगितले. ते म्हणाले की, माझ्या काकांचे निधन झाले होते. याबाबत मी प्रदेशाध्यक्षांना माहिती दिली होती. तसेच, युवक काँग्रेसचे रामाशंकरजी यांनाही कळवले होते. मी त्यांच्याकडे सभेला उपस्थित राहण्याबाबत सूट मागितली होती.
युवक काँग्रेसचे अनूपपूर जिल्हाध्यक्ष मानवेंद्र मिश्रा यांनी प्रकृती ठीक नसल्यामुळे दिल्लीला जाता आले नसल्याचे सांगितले. मात्र, आपण संघटनेच्या प्रदेश नेतृत्वाला याबाबत पूर्वकल्पना दिली नव्हती, अशी कबुलीही त्यांनी दिली. मिश्रा म्हणाले की, माझी प्रकृती ठीक नव्हती. त्यामुळे मला दिल्लीला जाणे शक्य झाले नाही. मी प्रदेश नेतृत्वाला याबाबत माहिती दिली नव्हती. आमच्यात संवादाचा अभाव राहिला. मात्र, माझ्या संपूर्ण टीमने सभेला हजेरी लावली होती. सर्वांची तिकिटेही काढली होती. आता मी नेतृत्वाकडे माझे स्पष्टीकरण सादर करणार आहे. त्यांच्याप्रमाणेच युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष राजवीर सिंह कुडिया आणि सरचिटणीस सुमन मौर्य यांनीही प्रकृती अस्वास्थ्यामुळे रामलीला मैदानावरील सभेला उपस्थित राहता आले नसल्याचे सांगितले. कुडिया यांनी याबद्दल खेद व्यक्त केला. ते म्हणाले की, माझी प्रकृती अत्यंत खराब असल्यामुळे मला सभेला उपस्थित राहता आले नाही. यामागे दुसरे कोणतेही कारण नव्हते. पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये आणि माझ्या मतदारसंघात मी नेहमीच सक्रिय असतो.


