या बड्या नेत्याने दिले संकेत : महाराष्ट्रातील आणखी एक फुटणार
-शिंदे-फडणवीसांमध्ये वॉर
प्रतिनिधी
मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षही फोडला जाणार, असा खळबळजनक दावा काँग्रेसच्या नेत्याने केला. भविष्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येतील, असे भाकित शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी केले. वडिलांचा मतदारसंघ राखण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अपयशी का ठरले? असा खोचक सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला. शिवसेनेच्या सदस्यांना वेठबिगार समजाल तर धाराशिवमधील सत्ता सहा महिन्यात उलथवून टाकू, असा इशारा तानाजी सावंत यांनी भाजपा नेत्याला दिला. मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांना अटक होत नसेल तर या राज्याला हतबल गृहमंत्री लाभलेला आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
राजकारणात कधी काय होईल याचा अंदाज बांधणे कठीण असते. २०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजपाची कास सोडून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. त्यानंतर २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी एकसंध शिवसेनेतून उठाव करून ४० आमदारांसह गुवाहाटी गाठली. परिणामी संख्याबळ कमी झाल्याने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि शिंदेंनी भाजपाच्या मदतीने राज्यात महायुतीचे सरकार स्थापन केले. या घटनेला चार वर्षांचा कालावधी लोटला असतानाच आता शिंदेंचा पक्षही फोडला जाणार असल्याचा दावा काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे. “उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडून जी महायुती तयार झाली होती, त्या महायुतीची महाफोड होणार आहे. शिंदेंचा पक्षही फोडला जाणार अशी माहिती मिळत आहे. सध्या शिंदे-फडणवीसांमध्ये वॉर सुरू असून महाराष्ट्रात त्यात अडकला आहे,” असे लोंढे यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्याची समाजमाध्यमांवर जोरदार चर्चा रंगली आहे.
“भविष्यात ठाकरे-शिंदे एकत्र येतील”
भविष्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येतील, असे सूतोवाच शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी माध्यमांशी बोलताना केले. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले. विशेष म्हणजे गुरुवारी मुंबईत एका पुस्तक प्रकाशाच्या खासगी कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र दिसले होते. व्यासपीठावर आगमन होण्यापूर्वी त्यांच्यात औपचारिक चर्चाही झाली होती. या पार्श्वभूमीवर धंगेकर यांनी केलेल्या विधानाला महत्व प्राप्त झाले आहे. याबाबत माध्यमांनी खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता त्यांनी शिंदे आणि ठाकरे एकत्र येण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. महाराष्ट्र आणि मुंबई लुटणाऱ्यांच्या दावणीला बांधल्या गेलेल्यांशी कोणतीही तडजोड शक्य नाही, असे राऊत यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
-काँग्रेस नेत्याचा फडणवीसांना टोला
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधर फडणवीस यांनी प्रतिनिधित्व केलेल्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात भाजपाला पराभवाचा धक्का बसला. यावरून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी फडणवीसांवर टीका केली आहे. वडिलांचा मतदारसंघ राखण्यात फडणवीस अपयशी का ठरले? असा खोचक सवाल वडेट्टीवार यांनी विचारला. नरेंद्रजी वाराणसीत हरले, तर देवेंद्रजी नागपुरात हरले, अशी टिप्पणी करीत त्यांनी या निकालाचे राजकीय महत्त्व अधोरेखित केले. नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातील निकाल म्हणजे सत्तेच्या अहंकाराला जनतेने दिलेले उत्तर असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. निवडणुकीपूर्वी विजयाचे दावे करणाऱ्यांना मतदारांनी आपल्या कौलातून वास्तवाची जाणीव करून दिली. हा विजय केवळ एका उमेदवाराचा नसून जनतेच्या भावना आणि लोकशाहीवरील विश्वासाचे प्रतिबिंब असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. दरम्यान वडेट्टीवार यांच्या टीकेला आता भाजपा काय प्रत्युत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
शिवसेनेच्या सदस्यांना वेठबिगार समजाल तर धाराशिव जिल्हा परिषदेतील सत्ता सहा महिन्यांत उलथवून टाकू असा इशारा तानाजी सावंत यांनी भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील व अर्चना पाटील यांना दिला. त्यांच्या वक्तव्यामुळे धाराशिव जिल्ह्यात महायुतीमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघड झाले. गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषदेमधील सत्तेच्या मुद्द्यावरून शिंदेसेना आणि भाजपामध्ये संघर्षाची ठिणगी पडली आहे. भाजपाचे नेते जिल्हा परिषदेत मनमानी करत असल्याचा शिंदेसेनेचा आरोप आहे. त्यावर आपल्या पक्षातील सदस्यांना संबोधित करताना तानाजी सावंत म्हणाले की, कुठलीही गोष्ट लादून घ्यायची नाही. आपण वेठबिगार नाही. आपल्या जीवावर सत्ता आलेली आहे. सत्ता तुमची नाही, सत्ता आमचीही आहे. मनमानी व हुकुमशाही पद्धतीने सत्ता चालवू नका, असा इशाराही त्यांनी भाजपाच्या नेत्यांना दिला आहे. त्यावर आता भाजपाकडून काय प्रत्युत्तर दिले जाणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांना अटक होत नसेल तर या राज्याला हतबल गृहमंत्री लाभलेला आहे, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. तसेच ज्या पद्धतीने शिवसेना पक्ष आणि चिन्ह चोरून एका दरोडेखोरांच्या हाती दिले ते देवेंद्र फडणवीस यांच्या मनाला खातंय, असा टोलाही त्यांनी लगावला. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत राऊत म्हणाले की, मीनाक्षी शिंदे यांनी पक्षाच्या पदाचा राजीनामा दिला आहे. हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पूर्णेकर यांच्या हत्येचा कट रचण्यामध्ये मीनाक्षी आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांचा सहभाग आहे. हत्येच्या तासाभरापूर्वी सर्व आरोपी एकत्र बसले होते. मीनाक्षी शिंदे यांनी आपल्या नवऱ्यालाच हत्येची सुपारी दिली होती. ही बाब ठाण्याच्या पोलिसांना, एसआयटीला, एकनाथ शिंदे यांना सगळ्यांना माहीत आहे. तरीही त्यांना अटक होत नसेल तर या राज्याला हतबल आणि दुर्बल गृहमंत्री लाभलेला आहे. या प्रकरणात पोलीस आयुक्तांचा आणि गृहमंत्र्यांचा बळी जाणार आहे, असा दावाही राऊत यांनी केला.


