भाजपाच्या नागपूर विधानपरिषद निवडणूक अपयशाची ही आहे प्रमुख कारणे

भाजपाच्या नागपूर विधानपरिषद निवडणूक अपयशाची ही आहे प्रमुख कारणे

-सत्ताधुंद नेत्यांना या बंडाची तीव्रता आली नाही

प्रतिनिधी
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला विश्वासात न घेता राजकारण करण्याचा फटका भाजपला नागपूर पदवीधर मतदारसंघात बसला. संघाच्या मुख्यालयी भाजपला सलग दोन वेळा या मतदारसंघात पराभूत व्हावे लागणे, हे स्थानिक आणि राज्यपातळीवरील नेतृत्वाचे अपयश मानले जात आहे.

कधी नव्हे ती पहिल्यांदाच नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची राज्यभर चर्चा झाली. त्याला कारणही ठरले ते पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध पक्षाच्याच ज्येष्ठ नेत्यांनी केलेले बंड. हे बंड साधेसुधे नव्हते. तर ते संघाच्या दोन स्वयंसेवकांचे आणि माजी आमदारांचे बंड होते. यामागे कारण होते पक्षाने दिलेल्या उमेदवाराबद्दलची नापसंती. सत्ताधुंद नेत्यांना या बंडाची तीव्रताच लक्षात आली नाही. ज्यांच्याकडे या निवडणुकीची जबाबदारी होती, त्यांनी हे बंड हलक्यात घेतले. सर्व संबंधितांशी चर्चा करून ते थोपवले जाईल, असे ते सांगू लागले. पण अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस उलटून गेला, तरी बंड शमले नाही. उलट, संघाच्या मुख्यालयाला खेटून असलेल्या बडकस चौकात बंडखोर उमेदवाराने प्रचार कार्यालय उघडले. ते कार्यालय देणारे कोण, तर संघाचेच स्वयंसेवक! . यातून या निवडणुकीत संघ कोणासोबत असणार, याचे संकेत गेले. तेव्हा निवडणुकीची जबाबदारी असणाऱ्यांचे धाबे दणाणले.

हे बंड करणारे होते पदवीधर मतदारसंघाचेच भाजपचे माजी आमदार अनिल सोले. आणि त्यांना प्रचार कार्यालयासाठी जागा देणारे होते गिरीश व्यास. तेही पक्षाचे माजी आमदारच. दोघेही स्वयंसेवक. बंड का केले, याचे कारण सांगताना या दोन्ही माजी आमदारांनी म्हटले की, पक्षात निर्णय सर्वसंमतीने घेतले जात नाहीत. निर्णय घेताना सर्वांना विश्वासात घेतले जात नाही. पूर्वी असे होत होते; पण आता त्याला पूर्णविराम देण्यात आला आहे. हेच कारण भाजपच्या नागपूर पदवीधर मतदारसंघातील पराभवास कारणीभूत ठरले.

मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून सोले यांचे बंड शमवले आणि त्यांना प्रचारात सहभागी करून घेतले. . पण भाजप निम्मी लढाई त्याच क्षणी हरला होता. कारण, सोले यांनी बंडाचे जे कारण सांगितले, ते त्यांच्या पुरते मर्यादित नव्हते. ती पक्षातील निष्ठावंतांची भावना होती. पक्षाला मोठे करण्यात कष्ट उपसणाऱ्या संघ स्वयंसेवकांची आणि नंतर भाजपमध्ये सक्रिय होणाऱ्या कार्यकर्त्यांचीही ती भावना होती. बंड शमले, पण नाराजीची भावना कायम होती. सत्तेच्या जोरावर बंड शमवता येऊ शकते; मात्र भावना जिवंतच राहतात, असे स्वयंसेवकांचे म्हणणे होते.

ही भावना मतपेटीतून वेगवेगळ्या स्वरूपात उमटली. या निवडणुकीत भाजपच्या अवैध मतांची संख्या लक्षणीय असणे, हे या भावनेचे प्रगटीकरण होते का? की संघाला विश्वासात न घेता राजकारण करण्याविरुद्धचा हा राग होता? यावर आता विश्लेषण सुरू झाले आहे.

एरवी भाजप विजयी झाला, तर संघामुळे; आणि पराभूत झाला, तर संघ नाराज झाल्यामुळे, अशी कुजबुज केली जाते. संघ आपले महत्त्व वाढवण्यासाठी असे करतो, पण नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत असेच झाले का, की यामागे वेगळे कारण होते, याची चर्चा सुरू झाली आहे.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही असाच अनुभव आला होता. त्याचा फटका महाराष्ट्रासह देशात भाजपला बसला होता. त्यानंतरही राज्यात राजकारण करताना भाजपकडून संघाला विश्वासात घेतले जात नाही, त्यामुळे संघात आणि संघातून भाजपमध्ये आलेल्या नेते-कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे.