भीमाशंकर, जरांगेचे ५०० कोटी व दुष्काळावरून फडणविसांची कोंडी!

  • भीमाशंकर, जरांगेचे ५०० कोटी व दुष्काळावरून फडणविसांची कोंडी!

-अनेक आघाड्यांवर आव्हानांचा डोंगर

प्रतिनिधी
मुंबई : सध्याच्या घडामोडींमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोर एकाच वेळी अनेक आघाड्यांवरची आव्हानं उभी ठाकली आहेत. महायुतीतील मतभेद मिटवण्यापासून ते कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न हाताळणे आणि दुष्काळाच्या संकटात योग्य नियोजन करणे अशा जबाबदाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या खांद्यावर आहेत.

भाजपा आणि शिवसेनेत विधान परिषदेच्या उमेदवारांवरून झालेला वाद अद्याप शांत झालेला नसताना, आता एका ऑडिओ क्लिपमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या कथित ऑडिओ क्लिपमध्ये मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांचे आंदोलन कमकुवत करण्यासाठी शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत जरांगेंना ५०० कोटी रुपये पोहोचवल्याचा दावा केला जात आहे. याच प्रकरणामुळे भाजपा आणि शिंदेसेनेत वादाची ठिणगी पडली.

मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ऑडिओ क्लिप सादर केली होती. शिंदेसेनेवर ५०० कोटी पोहोचवल्याचे आरोप झाल्याने पक्षातील काही नेत्यांनी आरोप केला की, भाजपाला सोबत घेऊन एकनाथ शिंदे यांना संपवण्याचा कट आहे का? पण भाजपाच्या नेत्यांनी प्रत्युत्तरात म्हटले की, शिवसेनेचे आरोप थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करणारे आहेत. अन्यथा या क्लिपची सत्यता तपासली जाण्यापूर्वीच मंत्री उदय सामंत यांनी त्यात कथितरीत्या उल्लेख असलेल्या भाजपाच्या तिन्ही नेत्यांची नावं का घेतली? तर रामदास कदम यांनी असा आरोप केला की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी ही क्लिप तयार करण्यात आली आहे.

भाजपाच्या एका वरिष्ठ मंत्र्याने असाही दावा केला की, सत्ताधारी आघाडीत वारंवार फडणवीस यांना अस्थिर करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. ऑडिओ क्लिपचा वाद असो किंवा विरोधकांकडून होणारी टीका, या दोन्हींचा आधार घेत भाजपाविरोधात आक्रमक भूमिका घेण्याची शिवसेनेची पद्धत ठरलेली आहे, असे या मंत्र्याने म्हटले, त्यामुळे हा वाद केवळ एका ऑडिओ क्लिपपुरता मर्यादित नसून, महायुतीतील अंतर्गत संघर्षाचं प्रतिबिंब असल्याचं भाजपामधील काही नेत्यांना वाटतं.

ऑडिओ क्लिपवरून भाजपा आणि शिवसेनेत निर्माण झालेला संघर्ष कमी करण्याचे प्रयत्न आता सुरू झाले आहेत. दोन्ही पक्षांनी आपापली आक्रमक भूमिका काहीशी मवाळ केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षातील नेते, मंत्री आणि लोकप्रतिनिधींना भाजपावरील टीका थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर शिवसेनेने भाजपाविरोधात आक्रमक भूमिका घेतली. यानंतर भाजपामधील काही नेत्यांनी शिंदेंबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर शिंदेंनी लगेचच आपल्या पक्षातील नेत्यांना शांत राहण्याचे निर्देश दिले.

मात्र, महायुतीतील तणावाचं हे एकमेव कारण नाही. रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली फडणवीस यांची भेट घेतली, यावेळी अर्थ खात्यावर दावा सांगण्यात आला. अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर हे खातं फडणवीस यांच्याकडेच आहे, त्यामुळे एका बाजूला भाजपा-शिवसेनेतील वाद मिटवण्याचे प्रयत्न सुरू असताना, दुसरीकडे राष्ट्रवादीच्या अर्थ खात्यावरील दाव्यामुळे महायुतीतील अंतर्गत धुसफूस पुन्हा समोर आली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी ऑडिओ क्लिपची न्यायवैद्यक तपासणी करण्याचे आदेश दिले. या क्लिपची सत्यता तपासण्यासाठी एसआयटी नेमण्याचा आणि फॉरेन्सिक तपासणी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मात्र, चौकशीची घोषणा होणं ही पहिली पायरी आहे. हा तपास तार्किक निष्कर्षापर्यंत पोहोचेल का आणि ते सार्वजनिक केले जातील का, यावर या निर्णयाची विश्वासार्हता ठरणार आहे.

चौकशीची घोषणा करतानाच फडणवीस यांनी स्वत:च एक सवाल उपस्थित केला; क्लिप अडीच वर्षांनंतरच का समोर आली, असा सवाल उपस्थित केला. त्यांच्या या प्रश्नामुळे भाजपामधील काही नेत्यांमध्येही अस्वस्थता पसरली आहे.

भाजपाच्या रणनीतिकारांच्या मते, राज्यात याआधीही अनेक मुद्द्यांवरून आंदोलनं झाली होती. नीट पेपरफुटीविरोधातील आंदोलनं, मतदारयाद्यांची विशेष सखोल फेरतपासणी (एसआयआर) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), मनसे, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवरून सरकारला विरोधाचा सामना करावा लागला. तरीही, सध्याच्या ऑडिओ क्लिपच्या वादासारखा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न याआधी निर्माण झाला नाही, असे भाजपाच्या रणनीतिकारांनी म्हटले.

अभिनेता टायगर श्रॉफशी संबंधित गोळीबाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर विरोधकांसह मित्रपक्षांनीही टीका केली. गृहखाते फडणवीस यांच्याकडेच असल्याने ते टीकेचे धनी ठरले. मुंबईच्या मध्यवस्तीत घडलेली ही घटना रोखण्यात पोलिसांना अपयश आले. ४८ तासांत अनेक आरोपींना अटक झाली असली तरी या घटनेमुळे मुंबई पोलिसांची आणि गृहखात्याची प्रतिमा डागाळली आहे. विरोधकांनी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईवरून केंद्र सरकारलाही लक्ष्य केले आहे. बिश्नोई आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह एकच असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला.

या टीकेला प्रत्युत्तर देताना भाजपानेही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मविआ सरकारच्या काळातील कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित केला. त्या काळात पोलिसांचा गैरवापर झाल्याचा आरोप भाजपाचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. मुंबईत एका उद्योगपतीच्या घराबाहेर बॉम्ब ठेवण्यासाठी पोलिसांचाच वापर करण्यात आला होता, तसेच वरिष्ठ नेत्यांच्या निर्देशांनुसार पोलिसांकडून पैसे गोळा केल्याचे आरोपही झाले होते, असेही बन म्हणाले.