अमरावती लोकसभा उमेदवारीचा तिढा सुटता सुटेना

अमरावती लोकसभा उमेदवारीचा तिढा सुटता सुटेना

-नवनीत राणा यांचा प्लान बी तय्यार

प्रतिनिधी
अमरावती : भाजपने महाराष्ट्रातील 20 लोकसभा मतदारसंघाची यादी जाहीर केली आहे. त्यात जुन्यांबरोबर नव्यांनाही संधी दिली आहे. मात्र, ज्या जागांवरून तेढ आहे, त्या जागांवर भाजपने अद्यापही उमेदवार दिलेला नाही. येत्या एक दोन दिवसात हा तिढा सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, ज्या जागांवर तिढा आहे, त्या ठिकाणच्या विद्यमान खासदार आणि इच्छुकांच्या मनात धाकधूक निर्माण झाली आहे. त्यामुळेच या विद्यमान खासदार आणि इच्छुकांनी आपआपला प्लान तयार करण्यास सुरुवात केली आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनीही लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बी प्लान तयार केला आहे.

अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी भाजपला पाठिंबा दिला होता. भाजप आपल्याला अमरावतीची जागा सोडेल असं त्यांना वाटत होतं. पण भाजपने पहिल्या यादीत अमरावतीची जागा जाहीर केलेली नाही. अमरावतीच्या जागेसाठी शिंदे गट आडून बसला आहे. अमरावतीवर नेहमी शिवसेनेचं वर्चस्व राहिलं आहे. भाजपचा संबंध नाही, त्यामुळे ही जागा आपल्यालाच मिळावी असा होराच शिंदे गटाने लावला आहे. तर दुसरीकडे नवनीत राणा यांनीही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी भेटीगाठी घेऊन अमरावतीची जागा सोडण्याची विनंती केली आहे. मात्र, भाजपने याबाबत अद्याप कोणताच निर्णय घेतलेला नाही.

दुसरीकडे नवनीत राणा या भाजपमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा होती. पण नवनीत राणा भाजपमध्ये आल्या तरी अमरावतीची जागा आम्हालाच सोडली पाहिजे, असा आग्रह शिंदे गटाने धरला आहे. त्यामुळे नवनीत राणा भाजपमध्ये जाणार की नाही? गेल्यास त्यांना तिकीट मिळणार की नाही? याचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. त्यामुळेच नवनीत राणा यांनी सावध पावलं टाकायला सुरुवात केली आहे.