प्रकाश आंबेडकर यांना आघाडीच्या या नेत्याने लिहिले पत्र : हे ठरले कारण

प्रकाश आंबेडकर यांना आघाडीच्या या नेत्याने लिहिले पत्र : हे ठरले कारण

-संविधान वाचविण्यासाठी पुढे या

प्रतिनिधी
ठाणे : वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढल्यास लोकसभा निवडणुकीत ‘वंचित’ विरुद्ध भाजप, अशीच लढत रंगणार असल्याचा दावा करीत वास्तव लक्षात घेऊन महाविकास आघाडीने वाटपासंदर्भात आपसातील सेटलमेंट तातडीने करावी, असे मत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी व्यक्त केले. त्यामुळे, आंबेडकरांनी केलेल्या जागांची मागणी महाविकास आघाडीला अद्याप तरी मान्य नसल्याची चर्चा होत आहे. त्यामुळेच, अजूनही वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत येईल की नाही, यावर अद्यापही प्रश्नचिन्हच आहे. त्यातच, प्रकाश आंबेडकरांनी आजपासून जाहीर सभांना सुरुवातही केली आहे. त्याच अनुषंगाने आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रकाश आंबेडकर यांना विनंतीपर पत्र लिहिले आहे.

वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा सुरू आहे, ते आमच्यासोबत महाविकास आघाडीमध्ये असतील, असे शिवसेना प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी म्हटले आहे. आता, जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवरून पत्र लिहून प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीसोबतच यावे, असा आग्रह केला आहे. संविधान आणि लोकशाही हे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला दिलेले अमूल्य धन आहे. जर या संविधानाला हात लावला गेला तर पुढील पिढी आपणाला कधीच माफ करणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर समविचारी पक्षांसोबत एखादी बैठक घेऊन महाराष्ट्रात एक वेगळा संदेश दिला जाईल, यासाठी आपण प्रयत्न करूया ! जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.