भाजपाचे मिशन ४०० पार : ८० खासदारांना देणार नारळ

भाजपाचे मिशन ४०० पार : ८० खासदारांना देणार नारळ

-केंद्रीय निवडणूक समिती ऍक्टिव मोडवर

प्रतिनिधी
नवी दिल्ली : भाजपामध्ये मोठा भूकंप होणार आहे. देशभरातील जवळपास ८० खासदारांना नारळ देण्यात येणार आहे. त्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरविण्याविषयी भाजपचे वरिष्ठ साशंक आहेत. शतप्रतिशत भाजपसाठी पक्षाने कंबर कसली आहे.

अनेक जागांवर सध्याच्या काही खासदारांविषयी तक्रारींचा पाऊस पडल्यानंतर भाजपची केंद्रीय समिती सतर्क झाली आहे. भाजप लोकसभेच्या उमेदवारांची पहिली यादी लवकरच जाहीर करेल. त्यात सध्याच्या मोठ्या चेहऱ्यांसह भाजपसाठी कठीण असलेल्या मतदार संघातील उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे. पण देशभरातील जवळपास 80 खासदारांना तिकीट नाकारण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

भाजपच्या पहिल्या फळीतील नेत्यांनी आतापर्यंत उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, तेलंगाणा, उत्तराखंड, त्रिपुरा आणि इतर काही राज्यातील नेत्यांशी चर्चा केली आहे. काही मतदारसंघात नवीन चेहेरे देण्याची दाट शक्यता आहे. यापूर्वीच्या खासदाराला पुन्हा तिकीट न देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. भाजपच्या सूत्रांनुसार, या राज्यातून प्रत्येक मतदार संघासाठी तीन उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. आता भाजपची केंद्रीय निवडणूक समिती या उमेदवांराविषयी निर्णय घेईल. त्यानंतर मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येतील. पण यामध्ये 80 खासदारांना नारळ देण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.