आता हा असेल उद्धव शिवसेनेचा ठाण्यातील ढाण्या वाघ
-ठाकरे गटातील नियुक्ती जाहीर
प्रतिनिधी
ठाणे : जिल्ह्यात शिवसेनेचा एकमेव नेता म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. मात्र, त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. निवडणूक आयोगाने शिंदे यांना पक्ष आणि चिन्ह दिले. त्यामुळे आपसूक शिवसेनेचे प्रमुखपद एकनाथ शिंदे यांच्याकडे आले. उद्धव ठाकरे शिवसेनेचे कार्याध्यक्ष झाले तेव्हा एकनाथ शिंदे यांना आमदारकीची संधी देण्यात आली. शिवसेनेचे नेते पद देण्यात आले. मात्र याच नेतेपदावर आता एकनाथ शिंदे यांचे एकेकाळचे सहकारी असलेले खासदार राजन विचारे यांची नियुक्ती करण्यात आलीय.
ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खासदार राजन विचारे यांची नेतेपदी नियुक्ती केलीय. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील नियुक्ती पदे जाहीर करण्यात आली आहेत. पक्षाचे सचिव खासदार विनायक राऊत, राज्यसभा सदस्य अनिल देसाई, माजी मंत्री अनिल परब, आमदार रवींद्र वायकर. आमदार सुनील प्रभू यांचीही नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवसेनेचे नेते पदी नियुक्ती झाल्याबद्दल खासदार राजन विचारे यांचा ठाण्यात सत्कार करण्यात आला. ठाणे जिल्हा शाखेत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावतीने नेते राजन विचारे यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत त्यांनी संवाद साधला.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे त्याचबरोबर आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांनी आज माझी शिवसेना नेते म्हणून निवड केली त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. त्यांनी जो विश्वास माझ्यावर टाकला आहे त्या विश्वासाला कुठेही तडा लागणार नाही. एक सामान्य कार्यकर्त्याला चार वेळा नगरसेवक, महापौर, आमदार, दोनदा खासदार ही संधी कोणामुळे मिळाली? हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे मला हे पद मिळालं असे राजन विचारे म्हणाले.पं
तप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही असे एकनाथ शिंदे हे आमच्या साहेबांना म्हणतात. पण, मला वाटतं की त्यांनाच चैन पडणार नाही. ते बरोबर आहे कारण त्यांची चैन त्यांच्यामध्येच आहे. ज्या ताटात खाल्लं त्या ताटातच आज ते घाण करायला लागले आहेत. ज्यांच्यामुळे नगरसेवक झाला. ज्यांच्यामुळे तुम्हाला सभागृह नेते पद मिळालं, तुम्हाला आमदारकी मिळाली. पालकमंत्री पद मिळालं. ज्यांच्यामुळे तुम्ही नेता झालात असा टोला त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना लगावला.


