का म्हणाले राज ठाकरे, तीन-तीन इंजिन तरीही आरोग्य सेवेचा सत्यानाश

  • का म्हणाले राज ठाकरे, तीन-तीन इंजिन तरीही आरोग्य सेवेचा सत्यानाश

-नांदेड येथील घटनेवरून खळबळ

प्रतिनिधी
नांदेड : नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात 24 तासात 24 मृत्यू झाल्याच्या घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे. इतकेच नाही तर मृत्यूचे हे प्रमाण आणखी वाढतच आहे. मात्र, आता या प्रकारानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापताना दिसत आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस आणि पवार सरकारवर विरोधकांनी कडाडून टीका केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. तीन तीन इंजिनं लागून पण राज्याचे आरोग्य जर व्हेंटिलेटरवर असल्यासारखी परिस्थिती असेल तर उपयोग काय? असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

नांदेडमधल्या सरकारी रुग्णलयात गेल्या 24 तासात 24 मृत्यू झाले. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. मध्यंतरी ठाण्यात देखील अशीच घटना घडली. राज्यातल्या सरकारी रुग्णालयांमध्ये औषधाचा तुटवडा आहे. मुंबईत तर टीबीच्या औषधाचा तुटवडा असल्यामुळे ‘औषध पुरवून वापरा’ असा सल्ला दिला जातोय असं कळतंय. आणि ह्या घटना फक्त नांदेड, ठाणे आणि मुंबईपुरत्या नाहीत तर सर्वत्र आहेत. तीन तीन इंजिनं लागून पण राज्याचं आरोग्य जर व्हेंटिलेटरवर असल्यासारखी परिस्थिती असेल तर उपयोग काय? सरकारच्या तिन्ही पक्षांनी स्वतःचा पुरेसा विमा उतरवल्यामुळे त्यांना कसलीच काळजी नाहीये पण महाराष्ट्राचं काय ? दुर्दैव असं की सरकारमधले तीन पक्ष ठणठणीत सोडून बाकी महाराष्ट्र आजारी आहे अशी परिस्थिती आहे. सरकारने स्वतःच आयुर्मान वाढवण्यासाठीची धडपड कमी करून महाराष्ट्राचं आरोग्य कसं सुधारेल ह्याकडे अधिक लक्ष द्यावं.