का म्हणाले बच्चू कडू ? अजितदादा मुख्यमंत्री होतील
-राजकारण अंदाजाच्या पलिकडचे सुरू
प्रतिनिधी
अमरावती : खाती वाटपात पाठीमागून आलेल्या राष्ट्रवादीला झुकतं माफ मिळालेले आहे. जे राहिलेले आहेत, त्यांच्या नशिबी काय येईल हे माहिती नाही. पण जे अजितदादांना दिले ते त्यांच्या मतानुसार आणि सोयीनुसारच दिल्या गेले. यात राष्ट्रवादीने व्यवस्थित दबाव टाकलाय. ते यशस्वी झालेत असे मला वाटते, असे मत विधान बच्चू कडू यांनी केले.
अजित पवार मुख्यमंत्री होतील का? या प्रश्नावर बोलताना बच्चू कडू म्हणाले की, गेल्या पाच वर्षांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील स्थिती पाहिली तर अजितदादा मुख्यमंत्री होतील हे नाही म्हणू शकत नाही आणि हो देखील म्हणता येणार नाही. कारण हे राजकारण अंदाजाच्या पलिकडेचे सुरू आहे. मी गेल्या 20 वर्षापासून राजकारणात आहे पण एवढ्या घडामोडी पाच वर्षात झाल्या तेवढ्या कधीच झाल्या नव्हत्या, असे मत त्यांनी व्यक्त केले.
अजित पवार यांना अर्थमंत्रीपद देण्यास विरोध करण्यात आला होता. त्याबाबत विचारलं असता, अर्थमंत्रीपद देण्यास विरोध नव्हता. तर अर्थ खातं त्यांना देऊ नये असं सर्वांच मत होतं. मागच्यावेळी राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस एकत्र होते. त्यावेळी शिवसेनेच्या आमदारांना 25 लाख आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना 90 लाखाचा निधी दिला होता. ते परत होऊ नये म्हणून अर्थ खातं अजितदादांना द्यायला नको असं सर्वांना वाटत होतं. पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्या घटनेची पुनरावृत्ती होणार नाही, असं वाटतं. त्यांचा वॉच तेवढा राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
खाती वाटपानंतर तुमचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क झाला का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी नाही असं म्हटलं. रेंजेच नाही. मी नेटवर्कच्या बाहेर आहे. मंत्रालयाच्याच नेटवर्कच्या बाहेर आहे आम्ही. या पाऊल वाटेवर त्यांचं नेटवर्क येत नाही इकडे. भविष्याचा विचार करून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, असेही त्यांनी स्पष्ट केले.
न्यायालयाचा निकाल, अध्यक्षाचा निकाल यामुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता असं वाटत होतं. पण आता समजलं राष्ट्रवादीमुळेच मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता. काँग्रेस हा एक पक्ष येणं बाकी आहे. तोही आला तर काय हरकत आहे? असा चिमटा त्यांनी काढला. आता जे आहे ते शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून सामोरे जायचं. गाडी, घोडा, बंगला असूनही आता राजकीय नेते अस्थिर आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.


