का म्हणाले बच्चू कडू, तीन इंजिनाचे सरकार केव्हाही कोसळू शकते
– शिंदेंच्या गोटातील आमदारांत अस्वस्थता
प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीर गटाच्या शपथविधीची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ऐनवेळी देण्यात आली असावी. त्यामुळेच आमच्या शपथविधीचा विचार झाला नसावा, असा धक्कादायक दावा प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. राज्यातील तीन इंजिनाचे सरकार मजबूत आहे. पण ते केव्हाही कोसळू शकते, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
अजित पवार व त्यांच्या समर्थकांच्या सरकारमधील समावेशापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापुढील समस्यांत कमालीची वाढ झाली आहे. राष्ट्रवादीच्या सरकारमधील समावेशामुळे शिंदेंच्या गोटातील आमदारांत अस्वस्थता निर्माण झाली आहे. तसेच भाजपचेही काही आमदार नाराज झालेत. या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी वरील शब्दांत आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या शपथविधीची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना अगोदर देण्यात आली नसावी. त्यांना ते ऐनवेळी सांगण्यात आले असावे. त्यामुळे आमच्या शपथविधीचा वेळीच विचार झाला नसेल, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.
बच्चू कडू पुढे म्हणाले की, अजित पवारांना अर्थमंत्रीपद मिळू नये अशी आमच्या गटातील आमदारांची इच्छा आहे. महाविकास आघाडीच्या काळात अर्थमंत्रीपदी असताना त्यांनी पवारांनी निधीची पळवापळवी केली. त्यामुळे आम्ही इकडे आलो.
आम्ही अजित पवार यांचा आमच्या मतदार संघातील हस्तक्षेप अजिबात सहन करणार नाही. हे तीन इंजिनाचे सरकार आहे. ते मजबूत आहे. पण केव्हाही कोसळू शकते, असा इशाराही बच्चू कडू यांनी यावेळी दिला.
तुम्हाला कोणत्या जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची अपेक्षा आहे? या प्रश्नावर बच्चू कडू म्हणाले, मला कोणतीही अपेक्षा नाही. परिस्थिती येईल तसे आम्ही मार्गक्रमण करत असतो. मी अपेक्षा ठेऊन कधी चालत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मंत्रीपदाबाबत गत दोन-तीन दिवसांत मला कोणताही फोन आला नाही.
सत्ताधारी पक्षाचे 90 टक्के आमदार मुंबईत आहेत. हाच बच्चू कडू आणि इतर आमदारांमधील फरक आहे. इतके आमदार सांभाळताना नाराजी तर होणारच आहे. प्रत्येकाची वेगवेगळी अपेक्षा असते. सगळे आनंदी आहेत असे नाही. विरोधी पक्षातही सगळे आनंदी नाहीत आणि सत्ताधारी पक्षातही सगळे आनंदी नाहीत. त्यामुळे सगळे सुखी राहतील असा सुखी माणसाचा सदरा अद्याप तरी आलेला नाही, असेही बच्चू कडू यावेळी म्हणाले.
उल्लेखनीय बाब म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या समर्थक आमदारांनी गतवर्षी शिवसेनेत ऐतिहासिक बंडाळी केली. त्यात तत्कालीन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपद गेले. कालांतराने त्यांच्याकडील शिवसेना हे नाव व धनुष्यबाण हे पक्षचिन्हही शिंदेंच्या गटाला मिळाले. त्यानंतर शिंदे यांनी भाजपच्या मदतीने राज्यात सरकार स्थापन केले. तेव्हापासून शिंदेंच्या गोटातील आमदारांनी अनेकदा आपली मंत्रिपदाची महत्त्वकांक्षा बोलून दाखवली आहे.


