या नेत्याचा दावा : शिंदेसेनेला दोनअंकी आकडा गाठणे कठीण

या नेत्याचा दावा : शिंदेसेनेला दोनअंकी आकडा गाठणे कठीण

-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचे मत

प्रतिनिधी
नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या 40 पैकी किती आमदार निवडून येतील हे सांगणे महाकठीण असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केला आहे. शिंदेंसोबत असणाऱ्या 40 आमदारांपैकी पैकी किती जण निवडून येतील, हे सांगणे महाकठीण आहे. मी एखादा आकडा सांगितला तर तो माझ्या अंगावर येईल. पण माझ्या मते त्यांना दुहेरी आकडाही गाठता येणार नाही. 10 जण निवडून आले तरी खूप झाले, असे ते म्हणाले.

गतवर्षी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत सर्वात मोठी बंडखोरी झाली. एकनाथ शिंदे आपल्या समर्तक 40 आमदारांसह शिवसेनेतून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी शिवसेनेवर दावा सांगितला. त्यानुसार, त्यांना ती मिळाली. त्यानंतर ते सत्तेतही आले. या पार्श्वभूमीवर पूर्वाश्रमीचे शिवसैनिक असणाऱ्या छगन भुजबळ यांनी उपरोक्त दावा केला आहे.

भुजबळ म्हणाले की, मी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली, तेव्हा मी माझगाव विधानसभा मतदार संघाचा आमदार होतो. माझ्यासोबत 18 आमदार पक्षातून बाहेर पडले. आमच्यावर पक्षांतरबंदी कायद्यांतर्गत कारवाई होण्याची शक्यता होती. पण तत्कालीन विधानसभा अध्यक्ष मधुकर चौधरी यांच्यामुळे ती झाली नाही. माझी व माझ्या सहकाऱ्यांची आमदारकी वाचली. पण 1995 च्या निवडणुकीत शिवसेना नगरसेवक बाळा नांदगावकर यांनी माजा 12 हजार मतांनी पराभव केला. आमच्या पक्ष सोडण्यामुळे शिवसैनिक जराही डगमगले नाहीत. त्यामुळे माझा पराभव झाला.

– शिवसैनिक ठाम

शिवसेना शिवसैनिकांच्या रक्तात भिनलेली असते. नेता गेला तरी कार्यकर्ते पक्षासोबतच राहतात. माझगावमध्ये आम्ही पक्षाचे काम मजबुतीने केले होते. त्यामुळे मी शिवसेना सोडली तरी शिवसैनिक हलले नाहीत. त्यांच्या निश्चयामुळेच मला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे एकनाथ शिंदेंसोबत गेलेले किती आमदार पुन्हा निवडून येतील हे सांगणे सध्यातरी महाकठीण काम आहे, असे भुजबळ म्हणाले. ते एका मराठी वृत्तपत्राच्या कार्यक्रमात बोलत होते.

उद्धव ठाकरेबाबत सहानुभूतीची लाट

सध्या उद्धव ठाकरे यांच्या मोठ्या सभा होत आहेत. त्यांनी दिलेला राजीनामा, त्यांना सोडावा लागलेला बंगला, यातून त्यांना प्रचंड सहानुभूती मिळाली. या सहानुभूतीचे दर्शन त्यांच्या सभांतून होत आहे. यामुळेही शिंदे गटातील 40 पैकी किती आमदार निवडून येतील, हे सांगणे कठीण आहे. आता मी एखादा आकडा सांगितला तर ते माझ्या अंगावर येईल. पण माझ्या मते, त्यांना दुहेरी आकडाही गाठता येणार नाही. 10 जण निवडून आले तरी खूप झाले, असेही छगन भुजबळ यावेळी बोलताना म्हणाले.