घणाघात : ईडीने वटारले डोळे, एकनाथ शिंदे पळाले

घणाघात : ईडीने वटारले डोळे, एकनाथ शिंदे पळाले
-आज जागतिक गद्दार दिन
– संजय राऊत यांचा आरोप

प्रतिनिधी
मुंबई : ईडीने डोळे वटारले तर एकनाथ शिंदे पळून गेले. आम्हाला देखील ईडीच्या नोटीस आल्या पण आम्ही त्याचा सामना केला वेळप्रसंगी जेलमध्ये गेलो. त्यामुळे शिंदेसह त्यांच्या सहकाऱ्यांनी गद्दारी केली आहे, असा घणाघात ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी केला. आज जागतिक गद्दार दिन साजरा केला जावा, अशी मागणी देखील संजय राऊत यांनी युनोकडे केली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात ज्या प्रमाणे एकनाथ शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी गद्दारी केली. ज्या आईने लहानाचे मोठे केले. त्याच आईच्या पोटात खंजिर खुपसला आहे. त्यामुळे हा दिवस इतिहासात सर्वांच्या लक्षात राहावा, यासाठी आम्ही जागृती करणार आहोत. विशेष बाब म्हणजे गद्दार दिन साजरा व्हावा, ही लोकांची मागणी आहे.

युनोला आम्ही गद्दार दिन म्हणून साजरा यासाठी पत्र लिहिले आहे. तसेच पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींना देखील पाठवले. त्यामुळे मोदी आजपासून तीन दिवस अमेरिकेच्या दौऱ्यावर असल्यामुळे ते देखील गद्दार दिनाच्या पाठपुराव्यासाठी युनोककडे प्रयत्न करतील अशी अपेक्षा आहे.

मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार झाल्याचा आरोपासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसआयटी स्थापन करण्याची परवानगी दिली. यावर संजय राऊत म्हणाले की, त्यांनी मुंबई महापालिकेतील कामासाठी ज्या प्रमाणे एसआयटी स्थापन केली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी राहुल कुल, मंत्री दादा भुसेसह अनेक भ्रष्ट मंत्र्यांच्या चौकशीसाठी एक एसआयटी नियुक्ती करावी. त्याचे आम्ही स्वागत करू परंतू ते तसे का करत नाही, असा सवाल देखील राऊतांनी उपस्थित केला.

एकनाथ शिंदे यांच्या एका माणसाला ईडीने नुसते उचलून नेले. तर शिंदे दुसऱ्याच दिवशी शिवसेना सोडून पळून गेले. आम्हाला नोटीस आल्या, आम्ही तुरूंगात गेलो. तुमच्या सारखे भित्रे आम्ही नाही, त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यावर एकनाथ शिंदेंना आरोप करण्याचा कोणताच अधिकार उरलेला नाही.