महात्मा फुले, सावित्रीबाईंना भारतरत्न द्या : यूपीच्या या नेत्याची मागणी
– उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांचा पुढाकार
प्रतिनिधी
पुणे : देशाच्या सामाजिक क्षेत्रात अभूतपूर्व बदल घडवण्यासाठी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी काम केले आहे. त्यामुळे फुले दांपत्याला ‘भारतरत्न’ देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी सांगितले.
स्त्रीशिक्षणाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातून केल्यामुळे पुणे हे देशवासीयांसाठी तीर्थक्षेत्र बनले आहे. महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना देशातील सर्वोच्च नागरी सन्मान ‘ भारतरत्न ‘ मिळावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करून त्याबाबत उत्तर प्रदेश सरकार पाठपुरावा करणार आहे.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी समन्वय साधून फुले दांपत्याचे विशाल स्मारक बनावे याकरिता आम्ही आगामी काळात प्रयत्नशील राहणार आहोत.
अयोध्या येथे महाराष्ट्र भवन निर्मितीसाठी उत्तर प्रदेश सरकारचे संपूर्ण सहकार्य राहील. श्रीराम हे केवळ भाजपचे नसून सर्वांचे आहेत. त्यामुळे देशातील प्रत्येक राज्याला अयोध्येत त्यांच्या राज्याचे भवन बनवण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्यात येईल.
आमच्याकडून महाराष्ट्रात रोजगारासाठी होणारे स्थलांतर रोखण्यात आम्हाला यश आले आहे. “मोदी मॉडेल ‘नुसार स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीवर भर दिला जात असल्याने तरुणांना उत्तर प्रदेशमध्येच रोजगार मिळू लागला आहे. उत्तर प्रदेशचे रूपांतर ‘उत्तम प्रदेश’ असे करण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देशाचा सन्मान जगभरात वाढलेला आहे. मोदींची लोकप्रियता जनतेच्या मनामनात आहे. त्यामुळे तिसऱ्यांदा मोदी पंतप्रधान होतील. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये ८० पैकी ७५ आणि महाराष्ट्रात ४८ पैकी ४५ जागा आम्ही जिंकू. कर्नाटक विधानसभेत पराभव झाला असला तरी लोकसभेला संपूर्ण २८ जागांवर भाजपला विजय मिळेल, असा आम्हाला आत्मविश्वास आहे


