राजकीय अडचणी : केंद्रीय नेतृत्वाचे मुंबईत विनोद तावडेंना बळ

राजकीय अडचणी : केंद्रीय नेतृत्वाचे मुंबईत विनोद तावडेंना बळ
-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अडचणीत वाढ

प्रतिनिधी
मुंबई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आज (बुधवार) दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांचा हा दौरा संघटनात्मक बळकटीसाठी असला, तरी या दौऱ्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय अडचणी वाढल्या आहेत. कारण लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्रीय नेतृत्व मुंबईत विनोद तावडेंना बळ देताना दिसत आहे.

नड्डा यांचा हा दौरा लोकसभा निवडणुकीच्या तयारीची पाहणी करण्यासाठी आहे. मात्र, या दौऱ्यात ते बोरिवलीत तावडे यांच्या आमदारकीच्या काळात बांधलेल्या अटल स्मृती उद्यानालाही भेट देणार आहेत. याशिवाय नड्डा हे तावडेंच्या घरी स्नेहसंमेलनासाठी पण जाणार आहेत. विशेष म्हणजे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही मुंबई दौऱ्यावर असताना तावडे यांच्या घरी भेट दिली होती. केंद्रीय नेतृत्वाने तावडेंना विशेष महत्त्व दिल्याने उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या समर्थकांमध्ये राजकीय अस्वस्थतेचे वातावरण आहे.

विनोद तावडे सध्या भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदावर कार्यरत आहेत. ते मुंबई भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष राहिले आहेत. त्यानंतर त्यांनी मुंबई भाजपचे अध्यक्षपदही भूषवले आहे. पक्षाने त्यांना अचानक बोरिवली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. भाजपने तत्कालीन गुजराती भाषिक दिग्गज आमदार हेमेंद्र मेहता यांचे तिकीट कापून तावडे यांना ही उमेदवारी दिली होती.

विनोद तावडे आमदार झाल्यानंतर ते कॅबिनेट मंत्री झाले. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेल्या मतभेदामुळे विद्यमान आमदार असूनही त्यांना विधानसभेची उमेदवारी देण्यात आली नाही. आता गोपाळ शेट्टी यांच्या जागी तावडे यांना उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार म्हणून उभे करण्याची तयारी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून आपले निकटवर्तीय आमदार प्रवीण दरेकर यांना लोकसभेचे तिकीट मिळावे यासाठी फडणवीस इच्छुक आहेत. पण ज्या प्रकारे आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि आता भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी विनोद तावडे यांच्या घरी जाऊन महत्त्व दिले आहे. त्यामुळे फडणवीस यांची राजकीय अडचण वाढत्या स्पष्टपणे दिसून येत आहे.

विनोद तावडे आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार हे सध्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जवळचे असल्याचे बोलले जात आहे. हे दोन्ही ज्येष्ठ नेते महाराष्ट्र भाजपमध्ये फडणवीस यांचे प्रतिस्पर्धी मानले जातात. त्यामुळे हे दोघे एकत्र येऊन खरोखरच फडणवीसांचे वाढते महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न करणार का, हे येणारा काळच सांगेल.