काय बोलता? संजय राऊत जाणार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये
-या नेत्याच्या दाव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या
प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात येणाऱ्या काही आठवड्यांमध्ये आणखी एक भूकंप होणार आहे. संजय राऊत 10 जून म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे, असा खळबळजनक दावा भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी केला आहे.
राज्यात सुरु असलेल्या राजकीय हालचालींवरुन गेल्या काही दिवसात मोठे राजकीय भूकंप घडणार असल्याचे वक्तव्य अनेक राजकीय नेत्यांकडून करण्यात आले होते. यातील एक म्हणजे राष्ट्रवादीतील नेतृत्व बदलाचे संकेत आणि पुन्हा जैसे थे झालेली परिस्थिती यावरुन एक राजकीय उलाथापालथ घडून गेली आहे. आता नीतेश राणेंच्या या नव्या दाव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.
नीतेश राणे म्हणाले, शरद पवारांनी राजीनामा दिला तेव्हा देशभरातल्या नेत्यांनी त्यांना फोन केले. मात्र उद्धव ठाकरेंनी पवारांना फोन केला नाही. यापाठिमागे संजय राऊत आहेत जे ठाकरे-पवार भेट होऊ देत नाही. उद्धव ठाकरेंना एकटे पाडण्यासाठी राऊत हे षडयंत्र करत आहे. राऊत स्वतः चारचार वेळा जाऊन त्यांना भेटतो.
नीतेश राणे म्हणाले, संजय राऊत बेळगावात जाऊन भाजपवर टीका करतो. आजच्या रोखठोकमध्ये मोदींवर टीका केली आहे. कर्नाटक निवडणुकीत मोदींनी सरकारी पैसा वापरल्याचे हे म्हणत असेल तर ‘मविआ’चे सरकार असताना आदित्य ठाकरे डावोसला एकटा गेला नव्हता. संमेलनानंतर काही दिवस तिथे राहिले. वरुण सरदेसाई त्याच्यासोबत होते. बॉलिवूडचे मित्र-मैत्रिण सोबत होते. त्यांच्या हॉटेलचा, राहण्या-फिरण्याचा खर्च कोणी केला? मग हा जनतेचा पैसा पाण्यात नाही गेला का, असा सवाल राणेंनी उपस्थित केला.
नीतेश राणे म्हणाले, हिंदूंच्या विरोधी भूमिका, सत्यपाल मलिक यांना भेटले त्यांच्या पाया पडले. संजय राऊतांना हिंदूत्वाची अॅलर्जी. बीएमसी निवडणुका आल्यावर ठाकरे मराठी माणसावर बोलतात. राऊतांना केरला स्टोरीज आवडत नाही तर लवकरच दिशा सालियान फाईल्स ओटीटीवर येईल. उद्धव ठाकरेंच्या जोरावर मुंबई बंद करुन दाखवा. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंना कातळशिल्प दिसले नाही का? असा सवाल राणेंनी उपस्थित केला.


