नागपूर विभागातील या नेत्याची भाजपला सोडचिठ्ठी: धरला बीआरएसचा हात

नागपूर विभागातील या नेत्याची भाजपला सोडचिठ्ठी: धरला बीआरएसचा हात

-भाजपाला बसला पहिला धक्का

प्रतिनिधी
नागपूर :  तुमसर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव यांच्या उपस्थितीमध्ये भाजपला सोडचिठ्ठी देत बीआरएस पक्षात प्रवेश केला आहे.

केसीआर यांच्या हैदराबाद येथील शासकीय निवासस्थानी अनेक कार्यकर्त्यांसह प्रवेश सोहळा पार पडला. नवभारत निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवून, प्रत्येक भारतीय नागरिकाला त्याचा मूलभूत हक्क मिळवून देण्यासाठी पक्ष प्रवेश केल्याचे वाघमारेंनी म्हटले आहे. मागील अनेक दिवसांपासून चरण वाघमारे यांच्या बीआरएस पक्षात प्रवेशाच्या जोरदार चर्चा सुरू होत्या.

गेली अनेक दिवस मराठवाड्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला. राजकीय विश्लेषकांच्या मते बीआरएसच्या राज्यातील प्रवेशामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीला फटका बसण्याची शक्यता आहे. मात्र, असे असताना भाजपच्या विदर्भातील माजी आमदाराने पक्षात प्रवेश केल्याने राज्य भाजपला हा केसीआर यांच्या पक्षामुळे पहिला फटका बसला आहे.

चरण वाघमारे यांनी 2014 च्या निवडणुकीत तुमसर मतदारसंघातून भाजपकडून निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांचा विजय झाला होता. याआधी 1995 ते 2004 या मतदारसंघावर मधुकर कुकडे यांच्या नावाने ​​​​​​भाजपचा झेंडा होता, 2009 मध्ये काँग्रेस पक्षाचे अनिल बावणकर यांनी या मतदारसंघात निवडणूक लढवत विजय मिळवला होता. तर 2014 मध्ये भाजपचे चरण वाघमारे आमदार झाले. मात्र 2019 ला पक्षाने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. अपक्ष उभे राहूनही त्यांनी दोन क्रमांकाची मते घेतली होती. यामुळे आता 2014 च्या निवडणुकीत ते बीआरएसकडून निवडणूक लढविण्यासाठी तयारी सुरू केली असल्याचे दिसून येत आहे. यामुळेच अनेक कार्यकर्त्यांना सोबत घेत हैदराबाद गाठत त्यांनी पक्ष प्रवेश केला आहे.