का दिला मुंबईत उद्धव ठाकरेंनी ‘मी मुंबईकर’ चा नारा?

का दिला मुंबईत उद्धव ठाकरेंनी ‘मी मुंबईकर’ चा नारा?

– २२७ वॉर्डांपैकी १०२ वॉर्डात उत्तर भारतीयांची पकड

प्रतिनिधी
मुंबई : मुंबईतील २२७ वॉर्डांपैकी १०२ जागांवर उत्तर भारतीय मतदार निर्णायक भूमिका बजावतात. यामध्ये सुमारे ४६ जागांवर उत्तर भारतीय मुस्लिम मतदारांची संख्या दोन हजारांहून अधिक आहे. यामुळेच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आता उत्तर भारतीयांच्या मदतीने भाजपचा चक्रव्यूह छेदण्याचा इरादा असल्याचे सांगण्यात येत आहे.

मी मुंबईकर’चा नारा देत उद्धव ठाकरेंनी उत्तर भारतीय, गुजराती आणि इतर भाषिकांना शिवसेनेशी जोडायला सुरुवात केली होती. उत्तर भारतीयांमध्ये बाळासाहेब ठाकरेंवर विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या मोठी आहे. विशेषतः उत्तर भारतीय ब्राह्मण आणि ठाकूर हे हिंदुत्वाच्या मुद्द्यामुळे ठाकरे कुटुंबाचा आदर करतात.

ठाकरे देणार उमेदवारी

मुंबई महापालिकेच्या किती जागांवर उत्तर भारतीय मतदार निर्णायक भूमिका बजावतो. आम्ही अद्याप कोणतेही सर्वेक्षण केलेले नाही. पण बदललेल्या राजकीय परिस्थितीत ज्या जागांवर उत्तर भारतीयांची संख्या जास्त आहे आणि तिथे जर उत्तर भारतीय निवडणूक जिंकू शकतात तर उद्धव ठाकरे तिथे हिंदी भाषिक व्यक्तीला उमेदवारी देऊ शकतात, अशी माहिती शिवसेनेचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी दिली आहे. शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक मनोजसिंह यांनीही दुबे यांच्या म्हणण्याला समर्थन दिले आहे. त्यामुळे आगामी काळात चित्र स्पष्ट होणार आहे.

उत्तर भारतीय शिवसेनेसोबतच

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उत्तर भारतीयांसोबत अजून अनेक बैठका करणार आहेत. ठाकरे यांची दुसरी सभा शुक्रवारी अंधेरी येथे होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मुंबईतील उत्तर भारतीय ओबीसी समाज भाजपसोबत गेलेला नाही. उद्धव ठाकरे यांनी स्वत: पुढे जाऊन उत्तर भारतीयांना मदतीचे आवाहन केले आहे. त्यामुळे भाजपसोबत न गेलेला उत्तर भारतीय समाज मोठ्या संख्येने शिवसेनेत (उद्धव गट) सामील होईल, असा दावा शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक (उद्धव गट) डॉ. द्रिगेश यादव यांनी केला आहे.