पुण्यात चाललंय काय? काटे यांना उमेदवारी, कलाटेंचे बंड

पुण्यात चाललंय काय? काटे यांना उमेदवारी, कलाटेंचे बंड
-चिंचवडमध्ये टि्विस्ट

प्रतिनिधी
पुणे : भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने रिक्त झालेल्या चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत २६ फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. या मतदारसंघात भाजपने जगताप यांच्या पत्नी अश्विनी यांना उमेदवारी दिली असून त्यांनी सोमवारी अर्जही दाखल केला. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीने विठ्ठल कृष्णाजी काटे यांना उमेदवारी दिली. त्यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मंगळवारी अर्ज दाखल केला.

कसबा व चिंचवड या दोन्ही निवडणुका एकत्रित लढवण्याचा निर्णय महाराष्ट्र विकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी घेतला होता. त्यानुसार कसब्यात भाजपच्या हेमंत रासने यांच्याविरोधात काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली. त्याला उद्धव सेना व राष्ट्रवादी या दोघांनीही पाठिंबा दिला. त्यानुसार चिंचवडमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराला इतर दोन्ही मित्रपक्षांनी पाठिंबा देणे अपेक्षित होते. मात्र उद्धव सेनेचे राहुल कलाटे यांनी बंडखोरी करत ऐनवेळी अर्ज दाखल केला.

त्यामुळे या मतदारसंघात भाजप, राष्ट्रवादी व बंडखोर सेना उमेदवार अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. २०१९ मध्येही शिवसेनेशी बंडखोरी करणाऱ्या कलाटे यांना १ लाख १२ हजार मते मिळाली होती. मविआतर्फे आधी कलाटे यांनाच उमेदवारी दिली जाण्याची चर्चा होती, मात्र ऐनवेळी राष्ट्रवादीने काटेंचे नाव जाहीर केले. आता कलाटेंची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.