शिंदे गटाचे अजब उत्तर: धमक्यामुळे धरला गुवाहाटीचा रस्ता

शिंदे गटाचे अजब उत्तर: धमक्यामुळे धरला गुवाहाटीचा रस्ता

-केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाखल

प्रतिनिधी
मुंबई : आमदार महाराष्ट्रात परत आले, तर त्यांना बाहेर फिरणे अवघड होईल, अशा धमक्या सजंय राऊत यांनी दिल्या. त्यामुळे आम्हाला परराज्यात जावे लागले, असे उत्तर शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे दिल्याचे समोर आले आहे. निवडणूक आयोगाने 30 जानेवारीपर्यंत ठाकरे आणि शिंदे गटाला लेखी उत्तर सादर करण्याचे आदेश दिले होते.

ठाकरे गट आणि शिंदे गट सध्या एकीकडे निवडणूक आयोगात कायदेशीर लढाई लढतो आहे. दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयातही या बंड प्रकरणी याचिका दाखल आहे. या दोन्ही प्रकरणांवर फेब्रवारी महिन्यात निकाल येण्याची शक्यता आहे.

-20 जूनला झाले होते बंड

शिवसेनेमध्ये 20 जून एकनाथ शिंदे यांनी बंड केले. त्यांनी सूरत गाठले. पक्षाच्या बैठकीला दांडी मारली. त्यामुळे ठाकरे यांनी त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट यांच्या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या गेल्या. एकमेकांवर अगदी खालच्या पातळीपर्यंत जात टीका करण्यात आली. यावेळी संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली. शिंदे गटाचे आमदार महाराष्ट्रात परत आले, तर त्यांना बाहेर फिरणे अवघड होईल, असा इशारा दिला. नेमका हाच मुद्दा धरून या धमक्यामुळे आम्हाला परराज्यात जावे लागले, असे शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे सांगितले आहे.

बंडखोरांना दंडुक्याने सुजवा

शिंदे गटाने निवडणूक आयोगाला दिलेल्या उत्तरावर खासदार संजय राऊत म्हणाले की, मी शिंदे गटाला धमकी देतोय, असे शिंदे गट आता बोलत आहेत. मात्र, शिंदे गट गुवाहाटीला गेल्यावर त्यांच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचे दहिसर येथील भाषण पाहा. बंडखोरांना दंडुक्याने सुजवा, त्यांचे पार्श्वभाग बडवून काढा, असे व्यासपीठावर जाहीर भाष्य शीतल म्हात्रे यांनी केले होते.

पुढे संजय राऊत म्हणाले, बंडखोरांनी शिवसेना का सोडली?, याचे स्पष्टीकरण त्यांनी आधी द्यावे. खोके मिळाल्यामुळेच बंडखोरांनी शिवसेना सोडली आहे. शिंदे गट आता वैफल्यग्रस्त आहे. निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालयातील प्रत्येक लढाई शिंदे गट हारणार आहे.