फडणवीस का म्हणाले; मला जेलमध्ये टाकण्याचे टार्गेट
-एबीपी माझाच्या कार्यक्रमात स्पष्टोक्ती
प्रतिनिधी
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला. ठाकरे सरकारच्या काळात मला जेलमध्ये टाकण्याचे टार्गेट तत्कालीन सीपी संजय पांडे यांना दिले, असा गौफ्यस्फोट देवेंद्र फडणवीसांना यांनी केला.
तसेच, तत्कालीन ठाकरे सरकार आणि महाविकास आघाडीवरही त्यांनी टीकास्त्र डागलं. तसेच, पॉलिटिकल सरप्राईजेस देणारे फडणवीस आता आणखी काय सरप्राईज देणार का? आदी प्रश्नांचे उत्तरही फडणवीसांनी एबीपी माझाच्या ‘माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन’ कार्यक्रमात बोलताना दिले.
विविध प्रश्नांच्या उत्तरात देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 2024 पर्यंतचे सगळी सरप्राईजेस संपली आहेत. आता 2024 मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी अनेक मोठे सरप्राईजेस तुम्हा सर्वांना निश्चितपणे देऊ. पण आतातरी प्लान A, B, C काहीच नाही. प्लान गव्हर्नन्स आहे. आम्हाला सध्या गव्हर्नन्सवर फोकस करायचाय. आम्हाला महाराष्ट्र जो मधल्या अडीच वर्षात थांबला होता. विकास होत नव्हता, तो महाराष्ट्र आम्हाला पुन्हा त्या ग्रोथ पाथवर आणायचाय. हेच आमचं ध्येय आहे.”
तरुण, तडफदार, अभ्यासू आणि महाराष्ट्राच्या राजकारणातला तेल लावलेला नवा पैलवान. अर्थात देवेंद्र फडणवीस. महाराष्ट्र भाजपचे निर्विवाद नेतृत्व करणारे देवेंद्र फडणवीस यांचा विरोधी पक्षात असलेला वचक आणि वजन वाखाणण्याजोगे आहे. 2019 ते 2022 या तीन वर्षांच्या काळात मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता आणि उपमुख्यमंत्री अशी तीनही पदं त्यांच्या नावामागे लागली. एकनाथ शिंदेंचे बंड यशस्वी करण्यामागे असलेल्या शक्तीचा उगम फडणवीसांपासूनच सुरू होतो हे वादातीत सत्य आहे. महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधा, नगर नियोजन, शेती, सहकार आणि क्रीडा या सगळ्या विषयांमधील बारकावे जाणून कामं वायुवेगाने कशी करून घेता येतील यात त्यांची हातोटी आहे.
मात्र, त्याचवेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, सरकारची इमेज स्वच्छ ठेवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. बेरोजगारी, महागाईचे संकट अधिक गहिरे होत असताना महाराष्ट्राला उद्योगांसाठी पूरक आणि आघाडीचं राज्य बनवण्यासाठी त्यांचं काय व्हिजन आहे? उद्धव ठाकरेंशी संबंध कायमचे नादुरुस्त राहणार का? अजित पवार आणि राष्ट्रवादीचा पर्याय कायमचा संपलाय का? अशा राजकीय प्रश्नांवर थेट बोलण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमासाठी उपस्थित होते. त्यावेळी यांनी आपले व्हिजन स्पष्ट केलं.


