या नेत्याची मागणी: काँग्रेसला वाचवा, प्रदेशाध्यक्ष बदलवा

या नेत्याची मागणी: काँग्रेसला वाचवा, प्रदेशाध्यक्ष बदलवा

-माजी आमदार आशिष देशमुख यांचा आरोप

गजानन ढाकुलकर
नागपूर : महाराष्ट्रात काँग्रेसला वाचवण्यासाठी प्रदेशाध्यक्ष तत्काळ बदला, अशी मागणी माजी आमदार आशिष देशमुख यांनी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगेंना केली आहे. देशमुख यांच्या या घरच्या अहेरामुळे पक्षातील खदखद पुन्हा एकदा उफाळून आली आहे. महाराष्ट्रातील काँग्रेसचे भविष्य हे महाराष्ट्रातील लोकांच्या हातात आहे.

काँग्रेसला निर्णायक भूमिका घ्यावी लागणार आहे. त्यासाठी मजबूत नेते आणि कार्यकर्त्यांचं नेटवर्क तयार करावे लागणार आहे. नेते व कार्यकर्ते पुन्हा नक्कीच जुळतील पण त्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील शिर्षत्व नेतृत्व आणि कार्यकर्त्यांमधील दुवा म्हणजेच महाराष्ट्र प्रदेशातील नेतृत्व हे सक्षम असणे गरजेचे आहे. म्हणूनच, महाराष्ट्रात काँग्रेसची स्थिति सुधारण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष तत्काळ बदलण्याची नितांत गरज आहे असे या पत्रात नमुद केले आहे.

-महाराष्ट्र अध्यक्षानी विश्वास गमावला

फेब्रुवारी 2021 मध्ये नाना पटोले यांना मोठ्या विश्वासाने काँग्रेस श्रेष्ठींनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवली. पण तो विश्वास त्यांनी सपशेल फोल ठरवला. एकेकाळचा काँग्रेसचा बालेकिल्ला प्रदेशाध्यक्षांच्या कार्यशिलीमुळे काँग्रेसच्या हातातून निसटला आहे, असा आरोप देशमुख यांनी केला आहे.

पटोलेवर आरोपांच्या फैरी

सत्यजित तांबे यांच्या बंडखोरीने काँग्रेसची नामुष्की झाली. यात प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोले हेच जबाबदार आहेत. पटोलेंच्या कार्यकाळात पक्षाला सातत्याने नाचक्कीचा सामना करावा लागत आहे. ते प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून काँग्रेसची दाणादाण उडत आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर काँग्रेस पुढच्या काळात महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष ठरेल यासाठी आम्ही कामकाज करू, असे त्यांनी ठासून सांगितले होते. ते प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून काँग्रेसची वाताहत सुरु झाली आहे. डिसेंबर 2021 मध्ये विधान परिषदेसाठी नागपूरच्या जागेवरून काँग्रेस उमेदवार रवींद्र भोयर होते. पण मतदानाच्या काही तास आधी नाट्यमय घडामोडी झाल्या, अचानक अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना उमेदवारी दिली. त्यामुळे भाजपच्या बावनकुळे यांचा जबरदस्त विजय झाला.

हायकमांडचे आदेश होते मग हंडोरे…

जून 2022 मध्ये विधान परिषद निवडणूकीत चंद्रकांत हांडोरे हे नंबर एकचे उमेदवार होते. पण भाई जगताप यांना जास्त मते मिळाली, त्यामुळे चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव झाला. हांडोरे यांना निवडून आणण्याचे हायकमांडचे आदेश होते. तरीही या आदेशाच्या विरोधात निकाल लागला. 4 जुलै 2022 ला शिंदे-फडणवीस सरकारची बहुमत चाचणी परीक्षा होती. यावेळी विरोधकांची एकजूट महत्वाची होती. पण काँग्रेसचे तब्बल 10 आमदार या बहुमत चाचणीत गैरहजर राहिले. यामुळे सरकारचे बहुमत मोठ्या प्रमाणात वाढले. पक्षादेश असतांनासुद्धा अनेकांनी पक्ष विरोधी काम केले.