आज शेवटचा दिवस: शिक्षक मतदार संघासाठी काँग्रेसचे समर्थन कुणाला

आज शेवटचा दिवस: शिक्षक मतदार संघासाठी काँग्रेसचे समर्थन कुणाला

-जागा वाटपाचा फार्म्युला वेळेवर ठरल्याने घोळ

गजानन ढाकुलकर/विवेक पाटील

नागपूर : मागील अनेक दिवसांपासून तळ्यात-मळ्यात केल्यानंतर कॉंग्रेसने नागपूर शिक्षक मतदारसंघासाठी आपला उमेदवार न उतरविण्याचा निर्णय घेतला. मात्र, महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र गोंधळात कॉंग्रेस कोणाला समर्थन देणार याबद्दल तर्क लढवण्यात येत होते. माहितीनुसार, कॉंग्रेसने कोणत्या उमेदवाराला समर्थन देणार हे ठरवले आहे. अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर कॉंग्रेस आपला पाठिंबा कोणाला आहे हे जाहीर आहे.

प्राप्त माहितीनुसार, कॉंग्रेसने आगामी शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. नागपूर शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसने विदर्भ माध्यमिक शिक्षकसंघाचे उमेदवार सुधाकर अडबाले यांना समर्थन देणार असल्याची माहिती आहे. मात्र, याची अधिकृत घोषणा अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर कॉंग्रेस आपली भूमिका जाहीर करणार आहे. आज दुपारी तीनच्या सुमारास याची अधिकृत घोषणा पक्षाच्या वतीने करण्यात येणार आहे. मात्र, या संदर्भात महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फार्म्युला वेळेवर ठरल्याने हा घोळ झाल्याचे विदर्भ माध्यमिक संघाचे उमेदवार सुधाकर अडबाले यांनी सांगितले.

नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक म्हणजे अनिश्‍चिततेचा खेळ होऊन बसली आहे. कॉंग्रेसचा उमेदवार कोण किंवा पाठिंबा कुणाला, याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. असे असताना सतीश इटकेलवार यांनी  उमेदवारी अर्ज दाखल करुन निवडणुकीच्या रणधुमाळीत धूम उडवून दिली होती. “या निवडणुकीची तयारी आजची नाही, तर गेल्या वर्षभरापासून तयारी करत आहे. माझी दावेदारी म्हणजे आमच्या पक्षाचे मन वळवण्याचा हा एक प्रयत्न आहे. कारण मला जवळपास सर्व संघटनांचे समर्थन मिळाले आहे. संघटनांच्या प्रमुखांनी जरी सांगितले नसले, तरी त्यांच्या लोकांनी ही निवडणूक लढवण्यासाठी मला सांगितले आहे,” अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे सतीश इटकेलवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली होती. मात्र आज ते उमेदवार अर्ज मागणे घेणार आहेत.

नेमका उमेदवार कोण?

महाविकास आघाडीच्या वेगवेगळ्या गटांचे चार उमेदवार आता रिंगणात आहेत. शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे, उद्धव ठाकरे गटाचे गंगाधर नाकाडे, काँग्रेसप्रणित शिक्षक संघटनेचे सुधाकर अडबाले यांनी आधीच उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सतीश इटकेलवार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नागपूरचे प्रवक्ते आणि ओबीसी सेलचे प्रमुख आहेत. आज उमेदवारी अर्ज दाखल करून त्यांनी महाविकास आघाडीमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण केली आहे. आता पक्षाने काय ते ठरवायचे आहे आणि त्यासाठी आज, 16 जानेवारीपर्यंत वेळ आहे. पक्षश्रेष्ठी यावर काय तोडगा काढतात, याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत.