शिक्षकांची ‘निवडणूक शाळा’; 27 उमेदवार रिंगणात

शिक्षकांची ‘निवडणूक शाळा’; 27 उमेदवार रिंगणात

-३० जानेवारीला मतदान

गजानन ढाकुलकर
नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी प्राप्त नामनिर्देशनपत्रांची शुक्रवारी छाननी करण्यात आली. नामनिर्देशनपत्र दाखल करणारे सर्वच २७ उमेदवार निवडणुकीस वैध ठरले आहेत. येत्या १६ जानेवारीला अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे, तर ३० जानेवारीला मतदान होणार आहे.

नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करणाऱ्या २७ उमेदवारांच्या नामनिर्देशनपत्रांची शुक्रवारी विभागीय आयुक्त कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. विजयलक्ष्मी बिदरी आणि निवडणूक निरीक्षक अरुण उन्हाळे यांच्या उपस्थितीत छाननी करण्यात आली. या वेळी उमेदवार व त्यांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. छाननीत सर्वच उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.

भारत निवडणूक आयोगाने २९ डिसेंबर २०२२ रोजी नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. विभागातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांमधून शिक्षक मतदारसंघासाठी ५ ते १२ जानेवारी २०२३ दरम्यान एकूण २७ उमेदवारांनी ४३ नामनिर्देशनपत्र दाखल केले होते.

गडचिरोलीत सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान भारत निवडणूक आयोगाच्या ११ जानेवारी २०२३ च्या अधिसूचनेनुसार गडचिरोली जिल्ह्यात नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मतदानाच्या वेळेत बदल करण्यात आला. यानुसार जिल्ह्यात ३० जानेवारीला सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मतदानाची वेळ निश्चित करण्यात आल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा आयुक्त (सामान्य) प्रदीप कुलकर्णी यांनी दिली आहे. दरम्यान, उमेदवारांना १६ जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात ३० जानेवारीला सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होईल, तर २ फेब्रुवारीला निकाल आहे.