कुणी घातल्या काळ्या टोप्या, राज्यपाल हकालपट्टीची मागणी

कुणी घातल्या काळ्या टोप्या, राज्यपाल हकालपट्टीची मागणी

– अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीही आंदोलन

प्रतिनिधी
नागपूर : हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. आज भगतसिंह कोश्यारींची राज्यपाल पदावरून हकालपट्टी करावी, या मागणीसाठीही महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले आहेत. विरोधकांनी काळ्या टोप्या घालून सरकारचे लक्ष वेधले.

:-Update वृत्त

विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आज शेवटच्या दिवशीही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आंदोलन केले. ‘राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना हटवा, महाराष्ट्र वाचवा’, ‘अतिवृष्टीनेग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई केव्हा मिळणार?’, अशी घोषणाबाजी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली.

आंदोलनात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह मविआचे नेते सहभागी झाले होते. मविआ नेत्यांनी काळ्या टोप्या हातात घेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारींविरोधात घोषणाबाजी केली व त्यांना पदावरुन हकालपट्टी करण्याची मागणी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांचे निलंबन तसेच विरोधकांना बोलू न देता पक्षपातीपणा करीत असल्याचा आरोप करत विराेधकांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात अविश्वास ठरावाचे पत्र विधानसभेचे सचिव राजेंद्र भागवत यांना दिले आहे. त्यावर नाना पटोले, आदित्य ठाकरे, अदिती तटकरे, भास्कर जाधव, सुनील केदार आदींसह 47 सदस्यांच्या स्वाक्षऱ्या असल्याची माहिती आहे.