महाराष्ट्राच्या उद्योगाला दुष्ट ? मिंदे सरकारला झालंय काय ?
-माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांचा आरोप
प्रतिनिधी
मुंबई : टाटा एअर बसचा प्रकल्प राज्यातून गुजरातमध्ये गेल्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. वेदांता-फॉक्सकॉन, बल्क ड्रग्ज पार्क या दोन प्रकल्पानंतर तिसरा प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारवर चहुबाजूने टीका सुरू झाली आहे. राज्याचे माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी मिंदे सरकारवर बोचरी टीका केली.
राज्यातील प्रकल्प गुजरातला नेण्यासाठी सत्तांतर झाले असल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि राज्याचे माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी केला. सत्तांतर झाल्यानंतर राज्यातील तीन मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेले आणि एकाच राज्यात गेलेत. यावर शिंदे-फडणवीस सरकार ब्र देखील का काढत नाही, असा सवाल देसाई यांनी केला. भाजपच्या नेतृत्त्वातील केंद्र सरकारकडून राज्यातील उद्योग पळवापळवी करण्यासाठी मिंदे सरकार आले असल्याची बोचरी टीका देसाई यांनी केली.
टाटा-एअर बसचा प्रकल्प हा 22 हजार कोटींच्या प्रकल्पाबाबत सकारात्मक चर्चा सुरू असताना हा प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने प्रश्न निर्माण होत असल्याचे देसाई यांनी सांगितले. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर तीन मोठे प्रकल्प गेल्याने सरकारच्या भूमिकेवर प्रश्न निर्माण होत आहे. केंद्र सरकारने प्रत्येक राज्याला समान न्याय दिला पाहिजे. मात्र, केंद्राकडून तसे होताना दिसत नसून एका राज्याला झुकत माप दिले जात असल्याचे देसाई यांनी सांगितले.
सिनार मास (एशिया पेपर अँड पल्प) ग्रुप या इंडोनेशियन कंपनीने रायगडमध्ये उत्पादन प्रकल्प उभारणे ही उद्योग विभागातील अनेक अधिकारी मोठी उपलब्धी मानत आहेत. कारण यातून चार हजारांहून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. रायगडमध्ये हा कागद उद्योग सुरू झाल्यावर त्याच्यासोबत पॅकेजिंगसह इतर युनिट्सही बसवल्या जाणार आहेत. त्यामुळे सुमारे पाच हजारांहून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. त्यामुळे ही कंपनी तिथे का आली नाही, असा सवाल मीडियाने गुजरातला विचारला पाहिजे. या प्रकल्पासाठी राज्य सरकारने कंपनीला 300 एकर जमीन दिली आहे.
– हे प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर
वेदांत फॉक्सकॉन हा महाराष्ट्रातून बाहेर जाणारा प्रमुख प्रकल्प आहे. हा सुमारे 2 हजार कोटी रुपयांचा प्रकल्प होता. त्याचप्रमाणे बल्क ड्रग्ज फार्मा पार्कही येथून दुसऱ्या राज्यात गेले. महाराष्ट्रातून एकापाठोपाठ एक मोठे प्रकल्प बाहेर गेल्याने विरोधक शिंदे-फडणवीस सरकारवर सातत्याने हल्लाबोल करत आहेत. पण सध्याच्या सरकारचे म्हणणे आहे की, आधीच्या उद्धव ठाकरे सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे मोठे उद्योग महाराष्ट्रात येत नाहीत.


