चर्चाना वेग; मुकेश अंबानी यांचे सुपुत्र अनंत मातोश्रीवर

चर्चाना वेग; मुकेश अंबानी यांचे सुपुत्र अनंत मातोश्रीवर
– राजकीय वर्तुळात खलबते
प्रतिनिधी
मुंबई : सुप्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबानी यांनीही मातोश्रीवर जावून उद्धव यांची भेट घेतली. या भेटीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पण राजकीय वर्तुळात चर्चाना वेग आला आहे.

-अंबानी-ठाकरेंत तब्बल 3 तास चर्चा
यासंबंधीच्या वृत्तानुसार, अनंत अंबानी शुक्रवारी 8.20 च्या सुमारास मातोश्रीवर दाखल झाले. त्यांनी उद्धव ठाकरेंशी जवळपास 3 तास चर्चा केली. त्यानंतर 11.30 च्या सुमारास ते तेथून बाहेर पडले. या दोघांच्या चर्चेवेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेही उपस्थित होते. विशेष म्हणजे, उद्योगपती गौतम अदानी यांनी काही दिवसांपूर्वीच ठाकरेंची भेट घेतली होती. त्या बैठकीचाही तपशील बाहेर आला नव्हता. त्यानंतर आता अनंत अंबानी यांनी उद्धव यांची भेट घेतली आहे. या भेटीचा तपशील अजून उजेडात आला नाही. त्यामुळे या दोन्ही बैठकींविषयी वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात आहेत.

-महाराष्ट्रातील सत्तासंघर्षानंतर भेटीगाठी
यंदा महाराष्ट्रात मोठा राजकीय संघर्ष पहावयास मिळाला. या पार्श्वभूमीवर उद्योगपतींच्या ‘मातोश्री’वरील भेटीगाठी वाढल्या आहेत. गत जुलै महिन्यात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केली. ते जवळपास 40 आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेतून बाहेर पडले. यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर शिंदे यांनी भाजपशी आघाडी करून सरकार स्थापन केले. 100 हून अधिक आमदार असलेल्या भाजपने शिंदेंना मुख्यमंत्री केले. स्वतः देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. त्याला ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. हा मुद्दा सध्या सुप्रीम कोर्टात न्यायप्रविष्ट आहे.