सत्तार, भुमरेंना देणार उद्धव ठाकरेंचे नवे शिलेदार धक्का !

सत्तर, भुमरेंना देणार उद्धव ठाकरेंचे नवे शिलेदार धक्का !
-नव्या जबाबदारीचे वाटप
प्रतिनिधी
औरंगाबाद : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंच्या आदेशाने औरंगाबाद जिल्हाप्रमुखपदी किशनचंद तनवाणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. औरंगाबाद पूर्व विधानसभा, औरंगाबाद मध्य विधानसभा आणि औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघ, असे त्यांचे कार्यक्षेत्र राहील, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या मध्यवर्ती कार्यालयातून पत्रकाद्वारे सांगण्यात आले आहे.

गेली अनेक दिवस शिवसेनेतील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात शिंदेंचे नेतृत्व स्वीकारत आहे. औरंगाबाद हा शिवसेनेचा बालेकिल्ला सांभाळण्याची जबाबदारी आता उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडे केवळ 3 मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे. दानवे राज्याचे नेतृत्व करत असल्याने ते जिल्ह्यात जास्त काळ अडकून राहू नये म्हणून त्यांच्यावर 3 मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर मागील निवडणुकीत गंगापूरमधून अंबादास दानवेंनी जोरदार तयारी केल्याने, त्यांच्याकडे गंगापूर, वैजापूर, आणि कन्नड या 3 विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली. यात कन्नडची एक जागा शिवसेनेकडे, वैजापूरची एक जागा शिंदे गटाकडे तर गंगापूरची जागा भाजपकडे आहे.

-मनपामध्ये तनवाणी प्रमुख
तनवाणींचे शक्तिकेंद्र असणाऱ्या मनपा कार्यक्षेत्रात येणाऱ्या पूर्व, मध्य आणि पश्चिम मतदारसंघाची जबाबदारी माजी आमदार तथा माजी महापौर किशनचंद तनवाणी यांच्यावर देण्यात आली आहे. शहरी भागात त्यांचा असलेला जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांची फळी ही त्यांची जमेची बाजू आहे.

-सत्तारांच्या मतदारसंघात राठोड पाय रोवणार?
राजेंद्र राठोड हे सिल्लोड -सोयगाव मतदार संघात कार्यरत असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने त्यांच्यावर आता सिल्लोड, पैठण व फुलंब्री मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राजेंद्र राठोड हे गेल्या 25 वर्षांपासून शिवसेनेत असून जिल्हा परिषद सदस्य, समाज कल्याण सभापतीपद त्यांनी भूषवलेली आहे. त्यांच्या पत्नी व मुलगी यादेखील जिल्हा परिषद सदस्य राहिल्या आहेत. त्यांच्या रुपाने शिवसेनेला सत्तारांच्या मतदारांघात पक्षाला नवचैतन्य देता येईल का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

-शिंदे गटाकडून दोघांची निवड
उद्धव ठाकरेंनी जिल्ह्याची जबाबदार जरी तिघांवर दिली असली तरी शिंदेंनी मात्र माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ आणि जिल्हा परिषद सदस्य रमेश पवार यांच्यावर जबाबदारी दिली आहे. यामुळे आता आगामी मनपा आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.