भलतंच झालं! नागपुरातील शिंदे सरकारच्या खासदाराविरोधात जनहित याचिका

भलतंच झालं! नागपुरातील शिंदे सरकारच्या खासदाराविरोधात जनहित याचिका
प्रतिनिधी
नागपूर : शहरातील एका सरकारी जमिनीवर अवैध बांधकाम झाले असून त्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे रामटेक लोकसभा मतदारासंघाचे खासदार कृपाल तुमाने यांच्यावरही आरोप करण्यात आलेत.

नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे आणि अनिल पानसरे यांच्या खंडपीठाने तुमाने, राज्य सरकार, जिल्हा प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नागपूर सुधार प्रन्यासला नोटीस बजावल्या आहेत.

याचिकर्त्यानुसार, मौजा बाबुलखेडा परिसरातील द्वारकापुरी को-ऑप हाऊसिंग सोसायटीमधील तीन प्लॉटवर अतिक्रमण करून अवैध बांधकाम केले आहे. बांधकाम करणाऱ्यांमध्ये तुमानेंच्या नातेवाइकाचा समावेश आहे. १९७९ मध्ये या परिसरातील रिंग रोडच्या निर्माणासाठी येथील जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले. त्यानंतर अनेक रहिवासी प्लॉटसुद्धा जिल्हा प्रशासनाने अधिग्रहित केले. याबदल्यात प्लॉट धारकांना नुकसान भरपाईसुद्धा देण्यात आली. पुढे रिंग रोडचे काम पूर्ण झाले. कृपाल तुमानेने नासुप्र सभापतीला पत्र लिहून प्लॉट नियमित करण्याची मागणी केली. त्यावर निर्माणकार्य केले जाऊ शकत नाही, असा निर्वाळा देत ती मागणी फेटाळण्यात आली.