विरोधकांनी अविश्वास आणला; गावकऱ्यांनी पुन्हा सरपंच केला
-नागपूर जिल्ह्यातील सोनुर्ली गावातील प्रकार
प्रतिनिधी
बुटीबोरी : विरोधकांनी महिला सरपंच कामाचे नाही, ते जुमानत नाही म्हणून विरोधी बाकावरील सदस्यांनी अविश्वास आणला. त्यानंतर मतदान झाले. गावकरी मात्र आम्हाला याच महिला सरपंच हव्या म्हणून पार पडलेल्या गुप्त मतदान प्रक्रियेत त्यांना भरभरून मतदान केले. त्यांनी विजयाचा गुलाल उधळला. हा प्रकार नागपूर जिल्ह्यातील नागपूर ग्रामीण पंच्यात समितीतील सोनुर्ली गावात घडला.
या विजयी सरपंचाचे नाव कल्पना उलमाले आहे. त्या भाजपाच्या आहे. त्यांच्या विजयाची सर्वत्र चर्चा आहे. सोनुर्ली गटग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी बुधवारी (२८ सप्टेंबर) निवडणूक पार पडली. यामध्ये गावकऱ्यांनी भाजपाच्या कल्पना उलमाले यांना पसंती देत त्यांना पुन्हा सरपंचपदी विराजमान केले. उलेमाले यांना ३९३ पैकी २७१ मते मिळाली. विरोधकांनी सरपंचाविरुद्ध अविश्वास आणण्याकरिता ही निवडणूक घेतली होती. गटग्रामपंचायत सोनुर्ली येथील ग्रामपंचायत सदस्यांनी तहसीलदार नागपूर ग्रामीण यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला. यावेळी विशेष सभा घेण्यात आली. त्यात अविश्वास ठराव मान्य करून त्याला विशेष सभेची मंजुरी घेण्याकरिता गुप्त मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. सकाळी नऊ वाजता विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. या ग्रामसभेत ३९३ ग्रामस्थांनी आपली उपस्थिती दर्शवली.
त्यानंतर पीठासीन अधिकारी राजनंदनी भागवत यांनी सकाळी दहा वाजता प्रत्यक्ष गुप्त मतदान प्रक्रिया सुरू केली. ती दुपारी तीन वाजेपर्यंत चालली. सायंकाळी चार वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. जिल्हा परिषद शाळा सोनुर्ली येथील केंद्रावर एकूण ३९३ मतदारांनी मतदान केले. मतमोजणीनंतर उलमाले यांना २७१ मते मिळाली तर अविश्वास घेणऱ्यांना ११७ मते मिळाली. यात पाच मते अवैध ठरली. मतदान केंद्र अधिकारी मुनेश तलमले, साहाय्यक गटविकास अधिकारी गजानन चव्हाण, रवींद्र परतेकी, प्रमोद मालापुरे, शिवाजी नागरगोजे, संगीता मांढरे, ग्रामसेवक राजेंद्र नक्षिणे यांनी संपूर्ण मतदान प्रक्रिया यशस्वी केली. पोलीस निरीक्षक भीमाजी पाटील यांच्या मार्गदर्शनात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.


