महाराष्ट्रातील या मंत्र्याची लोकसभेसाठी तयारी

महाराष्ट्रातील या मंत्र्याची लोकसभेसाठी तयारी

-एसआयआरवरून होणार फेरबदल

प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेत पन्ना प्रमुखांबरोबर मतदान केंद्रनिहाय यादी वाचन करून ‘आपला – परका’ करण्याची प्रक्रिया भाजपमध्ये सुरू झाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या बांधणीत मंत्री अतुल सावे यांचा चेहरा राजकीय पटलावर तूर्तास ‘अग्रेसर’ म्हणून पुढे केला जात आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये सावे निवडून यावेत यासाठी जोरकस प्रयत्न करण्यात आले. ते निवडून आल्याने जिल्ह्यातील ग्रामीण भागावर सावेंचा ‘ संपर्क ’ विस्तारेल आणि निवडणुकीदरम्यान ‘महायुती’मध्ये गोंधळ उडालाच, तर भाजपचा स्वतंत्र चेहरा म्हणून मंत्री सावे यांचे नाव पुढे व्हावे असे प्रयत्न केले जात आहेत.

मंत्री सावे हे औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून निवडून येतात. हा पूर्णत: शहरी मतदारसंघ आहे. शिवाय मुस्लिम मतदारांची संख्या विजयाच्या जवळ जाणारी असल्याने मतविभाजनासाठी या मतदारसंघात अनेक प्रयोग केले जातात. अतुल सावे यांना त्याचा मोठा अनुभव आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये एकगठ्ठा होऊ पाहणाऱ्या मराठा मतांमध्ये विभाजन करण्यासाठी माजी शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांचा प्रयोग करण्यात आला.

कॉंग्रेसकडून उमेदवारी मिळणारे एम. के. देशमुख यांनी ऐन वेळी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यांना पुढे भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. या कामी मंत्री सावे यांनी पुढाकार घेतला होता. पुढे एका बाजूला एकगठ्ठा होणारी मुस्लिम मते आणि दुसरीकडे विरोधात जाऊ शकणारा मराठा मतदार निवडणुकीमध्ये विभागला गेला आणि अतुल सावे तिसऱ्यांदा केवळ २१६१ मतांनी निवडून आले.

आता मतदारसंघ बांधणीमध्ये ‘एसआयआर’मध्ये मतदारसंघ सुरक्षित करण्याची प्रक्रिया होईल का, याचे औत्सुक्य राजकीय अभ्यासकांना आहे. कमी फरकाने निवडून येणाऱ्या मतदारसंघात ‘एसआयआर’ कशा प्रकारे राबवले जाते, यावर भाजपचे वरिष्ठ नेते लक्ष ठेवून आहेत. मात्र, ही प्रक्रिया लोकसभा निवडणुकीसाठी उपयोगी ठरायची असेल, तर उमेदवार कोण असा प्रश्न भाजप नेत्यासमोर नेहमी होता.

काही उद्योजकांची नावे; तसेच काही जिल्ह्याबाहेरील चेहऱ्यांचीही चर्चा निवडणुकीपूर्वी केली जात होती. लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून आपला नंबर लागावा यासाठी माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनीही बरीच मेहनत केली होती. या वेळी मात्र सत्तेची साथ असल्याने ग्रामीण भागातील संपर्क वाढविण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे आणि तो चेहरा तूर्त तरी सावे यांचा असल्याचे दिसते आहे.