ममता- सोनिया यांच्यातील सिक्रेट बाहेर : या मुद्द्यावर झाली सहमती

ममता- सोनिया यांच्यातील सिक्रेट बाहेर : या मुद्द्यावर झाली सहमती

-विलीनकरणावरून टीएमसीतील खासदारांत मतभेद

प्रतिनिधी
नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अलीकडेच काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांची दिल्लीत भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीनंतर काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस पक्षाच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांना उधाण आले. बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर पक्षातील अनेक आमदार आणि खासदारांनी बंडाचे संकेत दिले. त्यावेळी सोनिया गांधी यांनी स्वत: ममता बॅनर्जी यांच्याशी संपर्क साधल्याचे वृत्त समोर आले. त्यामुळे दोन्ही पक्षातील विलीनीकरणाच्या चर्चांना आणखीनच हवा मिळाली.

भाजपाकडून तृणमूल काँग्रेसवर होत असलेल्या राजकीय हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करावा, अन्यथा भाजपा आम आदमी पार्टीप्रमाणेच तृणमूल काँग्रेसलाही मोठा त्रास देईल, असा प्रस्ताव सोनिया गांधी यांनी ममता बॅनर्जी यांना दिल्याचे काँग्रेसच्या अंतर्गत सूत्रांनी ‘सीएनएन-न्यूज १८’ला सांगितले. काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसने एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी न राहता एकत्र काम करण्याची गरज आहे. दोन्ही पक्षांसमोर सध्या अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे परस्पर संघर्ष करण्याऐवजी सहकार्याचा मार्ग स्वीकारणे अधिक योग्य ठरेल, असा सल्ला त्यांनी ममता यांना दिल्याचे सांगितले जात आहे. जर टीएमसीचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण झाल्यास ममता बॅनर्जी यांना राष्ट्रीय उपाध्यक्षपद आणि अभिषेक बॅनर्जी यांना महासचिव केले जाईल, अशी ऑफरही सोनिया यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. मात्र, राजकीय विश्लेषकांच्या मते, काँग्रेस आणि टीएमसी यांच्यात संवाद आणि सहकार्याची तयारी वाढल्याचे संकेत मिळत असले, तरी दोन्ही पक्षांमध्ये सध्या विलीनीकरणाबाबत कोणतीही सक्रिय चर्चा किंवा वाटाघाटी सुरू असल्याचे दिसून येत नाही.

ममतांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?
काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्यानेही दोन्ही पक्षांच्या संभाव्य विलीनीकरणाचा कोणताही अधिकृत प्रस्ताव सध्या विचाराधीन नसल्याचे स्पष्ट केले. विलीनीकरणाचा प्रस्ताव तृणमूल काँग्रेसकडून येणे गरजेचे आहे. मात्र, आमच्याकडे अद्याप असा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. त्याशिवाय विलीनीकरणाचा निर्णय घ्यायचा झाल्यास त्यावर काँग्रेसच्या नेत्यांचेही मत विचारात घेतले जाईल. सध्यातरी सोनिया गांधी यांनी पक्षातील कोणत्याही नेत्यांना याबाबत कल्पना दिलेली नाही, असे त्यांनी ‘सीएनएन-न्यूज१८’ला सांगितले. दुसरीकडे- तृणमूल काँग्रेसमधील बंडखोर गटाचे नेते ऋतब्रता बॅनर्जी यांनीही विलीनीकरणाच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. आमच्या दोन-तृतीयांशपेक्षा अधिक खासदारांचा काँग्रेसमध्ये जाण्याचा कोणताही विचार नाही. मग नेमके कोण कुणामध्ये विलीन होत आहे? आमचे खासदार, आमदार, महापालिकेतील प्रतिनिधी, जिल्हा परिषद सदस्य किंवा पंचायत सदस्य कुठेही जाणार नाहीत. त्यामुळे विलीनीकरणाचा प्रश्नच उद्भवत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.