तुकाराम मुंढे राजकीय नेत्यांना का नकोय? या विभागाचे बनले आयुक्त

तुकाराम मुंढे राजकीय नेत्यांना का नकोय? या विभागाचे बनले आयुक्त

-बदली होऊन दीड महिना ठेवले प्रतीक्षेत

प्रतिनिधी
मुंबई : धडाडीचे, प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून राज्यात नावलौकीक असलेले तुकाराम मुंढे अखेर आठवडाभराने अन्न व औषध प्रशासन आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारण्यास राजी झाले आहेत. सोमवारी दुपारी ११ वाजता मुंढे यांनी वांद्रे- कुर्ला संकुलातील अन्न व औषध प्रशासनाच्या राज्य मुख्यालयात आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला.

मुंढे यांची आठ दिवसांपूर्वी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. त्यापूर्वी त्यांची दिव्यांग सक्षमीकरण विभागातून तडकाफडकी उचलबांगडी केल्यानंतर मुंढे यांना गेले दीड महिना मुंढेंना पदाच्या प्रतीक्षेत ठेवले होते. पसंतीच्या अधिकार्‍यांकडे दोनदोन खाती आणि मुंढे यांना मात्र घरी बसवल्याने समाज माध्यमांमध्ये चर्चा होऊ लागली होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या विभागात मुंढे यांचेपुनर्वसन करण्यात आले आहे.

अन्न व प्रशासन आयुक्तपद हे भारतीय प्रशासन सेवेतील नवख्या अधिकाऱ्यांकडे किंवा बढतीने आयएएस झालेल्या अधिकाऱ्यांना दिले जाते. मुंढे यांचा अनुभव २० वर्षांचा असताना त्यांची या सामान्य पदावर बोळवण करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. अन्न व औषध प्रशासनाचे सचिव धीरज कुमार आहेत. ते मुंढे यांच्या तुकडीचे अधिकारी आहेत. त्यांना मुंढे कसे रिपोर्ट करणार म्हणून या पदाचा कार्यभार पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे यांच्याकडे देण्यात आला.

मुढे या सर्व खेळीने नाराज झाले. त्यामुळे त्यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारण्यास नकार दिला. दिव्यांग सक्षमीकरण विभागातून सहा महिन्यात मुंढे यांची उचलबांगडी करण्यात आली. त्याला कारण राजकीय नेत्यांच्या बोगस दिव्यांग संस्था आणि राज्य शासनात दिव्यांग बनावट प्रमाणपत्रावर नोकऱ्या पटकावलेले अधिकारी यांच्यावर मुढे यांनी कठोर कारवाईचा बडगा उगारला होता. मुंढे यांचे समाज माध्यमांवर लाखो पाठीराखे आहेत. मुंढे यांच्या बदलीनंतर समाज माध्यमांवर सरकारवर टीका झाली.

मुंढे यांच्या २० वर्षांच्या कालावधीत २५ बदल्या झाल्या आहेत. आयएएस अधिकाऱ्याची बदली मुख्यमंत्र्यांच्या सहीशिवाय होत नाही. मुंढे यांना आपल्या विभागाचे सचिवपद देण्यास बहुतांश मंत्र्यांचा विरोध आहे. ज्या मंत्र्यांनी दिव्यांग सक्षमीकरण विभाग स्थापन करण्यास पुढाकार घेतला होता, त्यानांच मुंढे नकोसे झाले होते. त्यामुळे मुंढे यांना सहा महिन्यात बदलीस सामोरे जावे लागले. मंत्री, आमदार, अधिकारी आणि ठेकेदार यांचे मंत्रालयात साटेलोटे आहे. या लॉबीच्या विरोधात गेल्यास प्रामाणिक अधिकाऱ्यांना बदलीची शिक्षा दिली जाते. मुंढे त्याचेच बळी ठरलेले अधिकारी आहेत.