राष्ट्रवादीला सोडचिट्टी देत: दोनशे गावांतील लोक गेले ठाकरे गटात

  1. राष्ट्रवादीला सोडचिट्टी देत: दोनशे गावांतील लोक गेले ठाकरे गटात-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठे खिंडार

    प्रतिनिधी
    औरंगाबाद : दोनशे गावांतील लोकांचा कौल घेऊनच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी दिली. बुधवारी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.

    चिकटगावकरांनी हातावरील घड्याळ सोडून शिवबंधन बांधल्यामुळे येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठे खिंडार पडले आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी रमेश बोरनारे यांनी मात्र, ही केवळ नव्या बाटलीत जुनी दारू असून असल्याचे स्पष्ट केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनी मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश केला. आपले काम पाहून पक्ष देईल तसा निर्णय घेणार असल्याचे ते म्हणाले. आमदार शिवसेना सोडून गेले तरी लोक शिवसेनेच्या बाजूनेच आहेत, असे विरोधी पक्षनेते आंबादास दानवे म्हणाले.

    या मतदारसंघावरील शिवसेनेचे दावेदार रमेश बोरनारे यांनी, यामुळे फरक पडणार नसल्याचे म्हणत, चिकटगावकरांचा पक्षप्रवेश म्हणजे नवीन बाटलीत जुनी दारू असल्याचे सांगितले. भावनेच्या जिवावर राजकारण चालणार नाही, विकासाचे मुद्दे घेऊन पुढे जात आहोत, त्यामुळे २०२४ मध्ये जनताच याचा कौल देईल, अशी प्रतिक्रिया बोरनारे यांनी दिली.

    ​​​​​​​चिकटगावकर यांनी २००४ व २००९ मध्ये अपक्ष निवडणूक लढवली होती. २०१४ मध्ये ते राष्ट्रवादी वैजापूर मतदारसंघातून काँग्रेसतर्फे निवडून आले. वैजापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काँग्रेसच्या ठोंबरे गटाला प्रवेश दिला. त्यामुळे चिकटगावकरांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत शिवबंधन बांधले.