विधिमंडळ अधिवेशनातही चर्चा; विरोधक आक्रमक होण्याची शक्यता

विधिमंडळ अधिवेशनातही चर्चा; विरोधक आक्रमक होण्याची शक्यता
-16 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

प्रतिनिधी
मुंबई : मुसळधार पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून लाखो हेक्टर शेतीही पाण्याखाली गेली आहे. राज्यात पावसाचे धुमशान सुरूच असून आज जवळपास 16 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनातही या मुद्द्यावरून आज चर्चा होण्याची शक्यता आहे. पुरात अडकलेल्या तसेच पावसामुळे नुकसान झालेल्या सर्वसामान्य व शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारने काय पावले उचलली? यावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.

विधान परिषद सदस्य सत्यजित तांबे यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विधानभवनात प्रवेश केला. यावेळी ते उपमुख्यमंत्र्यांशी बोलताना कॅमेऱ्यात कैद झाले. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवेळी सत्यजित तांबे हे भाजपमध्ये जातील, अशी चर्चा होती.

विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन केले. यावेळी मोदानी हटाव, धारावी बचाव, निधी असमान पण शासन गतिमान, 50 खोके अशा घोषणा विरोधकांनी दिल्या. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेस नेते भाई जगताप आदी काँग्रेस व ठाकरे गटाचे नेते या आंदोलनात सहभागी झाले होते.

राज्यात सध्या सुरू असलेल्या पावसामुळे अजित पवार यांनी आज कृषी विभागाची आढावा बैठक घेतली. या वेळी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचीही उपस्थिती होती. राज्यातील अतिवृष्टी, पूरस्थिती, अवर्षण परिस्थितीबाबत आढावा बैठक अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडली होती. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांकडून राज्यभरातील अतिवृष्टीची सद्यस्थिती जाणून घेत त्यावरील उपाययोजनांविषयी माहिती घेतली.