रामटेक लोकसभा जाणार नव्या चेहऱ्याच्या हाती

रामटेक लोकसभा जाणार नव्या चेहऱ्याच्या हाती
-रश्मी बर्वे, कुणाल राऊत, सुलेखा कुंभारे, अरविंद गजभिये यांची मोर्चेबांधणी
– कृपाल तुमानेंचा पत्ता होणार कट
प्रतिनिधी
नागपूर : रामटेक लोकसभेच्या गडाने अनेकांचे राजकीय भवितव्य तारले. माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव, विद्यमान राज्यसभा खासदार मुकूल वासनिक याच मतदारसंघातून मैदानात होते. राजकारणाचा हक्काचा विजयी आखाडा म्हणूनही याच मतदारसंघाकडे बघितले जाते. आता तर अनेक नवे चेहरे मैदानात शड्डू ठोकून आहे. त्यामुळे आगामी निवडणूक अतिशय चुरशीची होईल, अशी चर्चा आतापासून येथील राजकारणात रंगत धरत आहे.

शिंदे गटाचे विद्यमान खासदार कृपाल तुमाने, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रश्मी बर्वे, बरिएमंच्या सुलेखा कुंभारे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये यांनी मतदारांच्या भेटीगाठी वाढविल्या आहेत. त्यामुळे नवी समीकरणे उदयास येऊन वेगळे चित्र ऐनवेळी मतदारसंघात निर्माण होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येते. कामठी, काटोल, उमरेड, हिंगणा, रामटेक, सावनेर, आदी विधानसभांची गठ्ठा मते रामटेक लोकसभेचा विजयी उमेदवार ठरवितो. येथून जिंकून आलेल्यांनी मंत्रिपद भोगले तर काहींना पक्षातर्फे महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आल्याचा इतिहास आहे. इतकेच नव्हे तर देशाचे माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव देखील येथूनच जिंकले. त्यामुळे राजकारणाचे स्टार्टअप म्हणूनही रामटेक क्षेत्राकडे बघितले जाते. मात्र, मागील एक दशकापासून तत्कालीन शिवसेनेचे उमेदवार कृपाल तुमाणे यांच्या हातात खासदारकीची सूत्रे आहे. आता जातीय समीकरणे बघता काँग्रेस जि.प अध्यक्षा रश्मी श्यामकुमार बर्वे यांना उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा आहे. त्यामुळे इतर उमेदवारांची दमछाक होईल. भाजपा-सेना युतीतून जिंकण्याचा योग खासदार तुमाने यांना लाभला. मात्र, राज्यातील घडामोडीमुळे राजकारण तापले आणि युती तुटली. त्यामुळे तुमाणेंचा प्रवास तिकिट मिळाली तरी खडतर राहील.

-तुमानेंचे पॉलिटिकल कॅरिअर धोक्यात
तुमाणे हे शिंदेगटात गेल्यानंतर पक्षनिष्ठा, विकासकामांचे अभिवचन, मोठाली आश्वासने पार गुंडाळून ठेवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. परंतु, त्यांचा शिंदे गट प्रवेशाने रामटेक लोकसभेचा इतिहास माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहितेंची आठवण करून देत आहे. माजी खासदार प्रकाश जाधव यांनी मोहितेंना हरविले होते.

-रश्मी बर्वेंना पहिली पसंती
जिल्हा परिषद टेकाडी सर्कलमधून पहिल्यांदा जिंकून थेट जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे झाल्यात. पती श्यामकुमार बर्वे हे ग्रामपंचायत कांद्रीचे उपसरपंच राहिले. त्याशिवाय, इतर कुठलीही राजकीय पार्श्वभूमी त्यांच्यामागे नाही. मात्र, त्यांनी जिल्ह्यात सुरू केलेले दौरे, शिबिरे व जनसंपर्क त्यांच्या राजकीय आखाड्याची तयारी असल्याचे बोलले जाते. त्यांची वक्तृत्वशैली ही मतदारांत जान फुंंकणारी आहे. माजी मंत्री सुनील केदारांच्या तालमीत त्या तयार झाल्यात. परिणामी, काँग्रेससाठी हा चेहरा प्रभावी ठरेल, असाही मतप्रवाह सांगतो.

-युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांनाही संधी
काँग्रेसने युवकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांवर डाव खेळण्याचा प्रयोग पुन्हा चालविल्याची भूमिका घेतल्यास राहुल गांधी यांच्यासोबत काम करणारे माजी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे चिरंजीव तथा युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांना मैदानात आणले तर आश्चर्य होणार नाही. याशिवाय, सेवानिवृत्त आयएएस किशोर गजभिये असो की, देशाच्या राजकारणामध्ये अमिठ ठसा उमटविणारे माजी केंद्रीय समाज कल्याणमंत्री व राष्ट्रीय महासचिव मुकुल वासनिक असो यांना पक्षांतर्गत कलह व गटबाजीमुळे पराभव पत्कारावा लागला, अशा लंकाभेदींचा शोध घेऊन पक्षाला डॅमेज कंट्रोल करावे लागण्याचे दिव्य उभे आहेच.

-भाजपाकडून सुलेखा कुंभारे, अरविंद गजभियेंच्या नावाची चर्चा
जातीय मतांचे विभाजन झाल्यास मूळ एससी संवर्गाचे मतदान मतपेटीत खेचण्यासाठी केंद्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या माजी सदस्या, प्रशासकीय व संसदीय प्रणालीचा दांडग्या अनुभवी माजी राज्यमंत्री अ‍ॅड. सुलेखा कुंभारे यांच्या नावाची चर्चा जोरात आहे. त्यांची भूमिका भूमिगत असली तरी त्यांनी हा प्रस्ताव नाकारल्यास भाजपाचे नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये यांची वर्णी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.