रंगला वाद : या पक्षात प्रात: विधीसाठी हायकमांडची परवानगी
-भाजपा-काँग्रेस नेत्याचे तोडीस तोड
प्रतिनिधी
नागपूर : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. संजय राऊत आणि अजित पवार यांच्या नंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात खडीगंमत रंगली आहे.
फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली वारीवरून नानांनी दिल्लीला विचारल्याशिवाय यांचे पानही हलू शकत नाही. राज्यकारभार करणे तर दुरची गोष्ट आहे, अशी बोचरी टीका केली. त्यावर काँग्रेसमध्ये प्रातर्विधीसाठी हायकमांडची परवानगी लागते, अशी जहरी टीका फडणवीसांनी केली.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीच्या इशाऱ्यावरच काम करतात. दिल्लीकरांनी सांगितल्याशिवाय हे एकही निर्णय घेऊ शकत नाहीत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्लीचे हस्तक असून त्यांचा एक पाय कायम दिल्लीतच असतो, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली. त्यावर नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसमध्ये प्रातर्विधीसाठी जायचे असेल, तरी हायकमांडची परवानगी घ्यावी लागते, असे सडेतोड उत्तर दिले. आमचा राष्ट्रीय पक्ष आहे. आम्ही दिल्लीला गेलो तर काय वाईट आहे. शिंदे-फडणवीसांच्या दिल्ली वारीच्या बाबतीत ते दिल्लीत मुजरा करायला दोघे गेले होते, अशी टिका संजय राऊत यांनी केली होती. त्यावर बोलताना संजय राऊत दखलपात्र नाहीत असे ते म्हणाले.
मंत्रिमंडळ विस्तार होणारच आहे. मात्र नेमका कधी आणि केव्हा होणार ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठरवतील आणि तेच सांगतील. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित लढायच्या, या विषयावर आमची काल सविस्तर चर्चा झाली. याची एकत्रित स्ट्रॅटिजी तयार करायची आणि दोन्ही पक्षांमध्ये जिल्हा स्तरापासून ते तालुका स्तरापर्यंत समन्वय घडवायचा, अशी चर्चा झाल्याचे फडणवीसांनी सांगितले.
औरंगजेबाचे छायाचित्र झळकावण्यात आले. असले प्रकार येथे मान्य केले जाणार नाही. या देशात आणि विशेषतः महाराष्ट्रात आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजच असू शकतात. कुणी औरंग्याचे नाव घेत असेल, तर त्याला माफी नाही, अशा शब्दांत त्यांनी खडसावले.


