या नेत्याचे फटाके; निवडणूक आयोगासह इतर संस्थांही काबीज

या नेत्याचे फटाके; निवडणूक आयोगासह इतर संस्थांही काबीज
-पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यशैलीवर आक्षेप
प्रतिनिधी
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक आयोगासह इतर संस्थांही काबीज केल्यात. त्यामुळे त्यांच्याकडून महाराष्ट्रावर अन्याय करणारे निर्णय होत आहे, असा घणाघात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणीही त्यांनी केली. ते सातारा येथील काँग्रेस कमिटीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, प्रदेश सचिव राजेंद्र शेलार, नरेश देसाई, उदयसिंह पाटील आदी उपस्थित होते. माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, ‘काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक २२ वर्षांनी झाली. ही निवडणूक पक्षाच्या घटनेनुसार झाली. आता मल्लिकार्जुन खरगे हे अध्यक्ष झाले. त्यांच्या माध्यमातून पक्षाला चांगले दिवस येतील. राहुल गांधी यांचीही ‘भारत जोडो’ पदयात्रा सुरू आहे. ७ नोव्हेंबरला महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यात ही यात्रा येत आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव करून लोकशाही टिकविण्याचे काम राहुल गांधी यांची ही ‘भारत जोडो’ यात्रा करेल. त्याचबरोबर काँग्रेसमधून जे बाहेर गेलेत, त्यांना परत कसे आणता येईल, हेही पाहिले जाणार आहे.

-सरकार घालविण्यासाठी काँग्रेसशिवाय पर्याय नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना चव्हाण म्हणाले, केंद्रीय निवडणूक आयोग हा स्वायत्त आहे का नाही, असा प्रश्न आहे. कारण, पंतप्रधानांनाच अशा संस्थांच्या नेमणुकीचे अधिकार आहे. राज्यातील सरकार तर तात्पुरती व्यवस्था आहे. ईडीच्या तावडीतून सुटण्यासाठी हे डबल इंजिनचे सरकार आहे. याचा फटका राज्याला बसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार घालविण्यासाठी काँग्रेसलाच पुढाकार घ्यावा लागेल.’

-सोनियांविषयी नाराज होण्याचे कारण नाही
काँग्रेसवर आपण नाराज होता, त्याचे काय झाले? असा प्रश्न पत्रकारांनी केल्यावर माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, त्यावेळी आम्ही काँग्रेस अध्यक्षांना पत्र दिले होते. हे पत्र गोपनीय होते. तरीही त्याची माहिती बाहेर गेली. त्यावेळी सोनिया गांधींनी सर्व बाबी मान्य केल्या. आता नाराज असण्याचे कारणच नाही.