या नेत्यांविरुद्ध गंभीर तक्रारी, बलात्काराचे गुन्हे: तरीही गुन्हे नाही

या नेत्यांविरुद्ध गंभीर तक्रारी, बलात्काराचे गुन्हे: तरीही गुन्हे नाही

– आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांचा आरोप

विवेक पाटील
नागपूर : महिला आयोगाकडे अनेक बड्या नेत्यांविरोधात तक्रारी दाखल आहेत. या नेत्यांवर बलात्काराचे गुन्हे दाखल आहेत. मात्र, त्यांच्यावर सरकारकडून कोणतीच कारवाई केली जात नाही, असा आरोप महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी केला आहे.

तसेच, विरोधी पक्षातील नेत्यांवर ज्याप्रमाणे कारवाई केली जाते, तशीच कारवाई भाजप नेत्यांवरही झाली पाहीजे, असे मतही रूपाली चाकणकर यांनी व्यक्त केले. एका खासगी कार्यक्रमाच्या निमित्ताने रूपाली चाकणकर नागपुरात आल्या असता. यावेळी रूपाली चाकणकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी रूपाली चाकणकर म्हणाल्या, कायदा हा सर्वांसाठी सारखा असतो. मात्र, राज्यात आणि केंद्रात हा कायदा सर्व पक्षांसाठी सारखा नाही, असे दिसत आहे. केवळ एका वक्तव्यावरुन राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. राहुल गांधी यांचे प्रकरण पाहता हा देश हुकूमशाहीकडे जात आहे का?, अशी शंका येते. मात्र, सरकारविरोधी पक्षांकडून राहुल गांधी यांना पाठिंबा मिळत आहे.

रूपाली चाकणकर म्हणाल्या, शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्याविरोधात महिलेने बलात्काराची तक्रार केली आहे. महिला आयोगाकडेही महिलेने याबाबत तक्रार केली आहे. राज्य महिला आयोगाने या तक्रारीची दखल घेत सरकारला सहा पत्रे पाठवली. आम्हाला अपेक्षा होती कारवाई होईल, मात्र तसे झाले नाही. जशी कारवाई ही विरोधी पक्षातील नेत्यांवर केली जाते तशी भाजपच्या नेत्यांवरही झाली पाहीजे.

रुपाली चाकणकर म्हणाल्या, महिला संदर्भातील गंभीर प्रकरणात राज्य महिला आयोग स्वत:हून दखल घेते किंवा ज्या महिला आयोगापर्यंत पोहोचू शकत नाही अशा महिलांच्या संदर्भात स्वत:हून दखल घेते. मात्र अमृता फडणवीस किंवा अनिक्षा जयसिंघानी यांच्या प्रकरणासंदर्भात आमच्याकडे कुठलीच तक्रार आली नाही. त्यामुळे आम्ही दखल घेण्याचे कारण नाही. आमच्याकडे तक्रार आली तर आम्ही नक्कीच त्याची दखल घेऊ. सत्य परिस्थिती पोलिसांच्या तपासातून बाहेर आली पाहिजे.