मोठा दिलासा: दिल्ली हायकोर्ट म्हणते मशाल ठाकरेंचीच

मोठा दिलासा: दिल्ली हायकोर्ट म्हणते मशाल ठाकरेंचीच
– समता पक्षाचा दावा खोटा
प्रतिनिधी
दिल्ली :उद्धव ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. ठाकरे गटाच्या मशाल चिन्हावर समता पक्षानेही दावा करत दिल्ली हायकोर्टात याचिका केली होती. याचिकेत ठाकरे गटाकडून मशाल चिन्ह काढून घेण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, ही याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळून लावली आहे.

-काय आहे वाद ?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मिळालेल्या ‘धगधगती मशाल’ चिन्हावर दिवंगत जॉर्ज फर्नांडिस यांच्या समता पार्टीनेही दावा केला होता. 1996 पासून हे चिन्ह आपल्याकडे असल्याचे सांगत समता पक्षाने निवडणूक आयोगाकडेही धाव घेतली होती. इतकेच नव्हे तर अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवार देण्याची घोषणाही पक्षाने केली होती. समता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तृणेश देवळेकर यांनी ठाकरे गटाच्या मशाल चिन्हावर आक्षेप घेतला होता.

-निवडणूक आयोगाचे म्हणणे ?

याबाबत राज्य निवडणूक आयोगाने समता पक्षाला उत्तर दिले होते की, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळालेले “मशाल’ हे चिन्ह अंतरिम स्वरूपाचे नाही. अंधेरी पोटनिवडणुकीनंतर त्याच्या पुनर्वाटपाबाबत विचार केला जाऊ शकतो. मात्र, या उत्तरावर समाधान न झाल्याने समता पक्षाने निवडणूक आयोगाविरोधात दिल्ली हायकोर्टात धाव घेतली होती.

-हायकोर्टाला आयोगाचा दावा मान्य

निवडणूक आयोगातर्फे दिल्ली हायकोर्टात सांगण्यात आले की, उद्धव ठाकरेंच्या पक्षाला फक्त अंधेरी पोटनिवडणूकीपुरतेच चिन्ह दिल्याचे सांगितले. नंतर ते खुले होईल. तसेच नंतर समता पार्टीला काही आक्षेप असल्यास न्यायालयात याचिका दाखल करूनच ते परत मिळवता येईल, असेही आयोगाकडून सांगण्यात आले. दिल्ली हायकोर्टाने आयोगाची ही बाजू मान्य करत समता पक्षाची याचिका फेटाळून लावली.

-समता पक्ष जाणार सुप्रीम कोर्टात

दरम्यान, समता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तृणेश देवळेकर यांनी मशाल चिन्हासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचाही इशारा यापूर्वी दिला आहे. आता दिल्ली हायकोर्टाचा निकाल आल्यानंतर समता पक्ष पुढे काय पाऊल उचलणार, हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

-धनुष्यबाण चिन्हावरून खरा वाद

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरून ठाकरे व शिंदे गटात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. सर्वोच्च न्यायालय तसेच निवडणूक आयोगापुढेही हा वाद सध्या सुरू आहे. या वादामुळेच शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह तात्पुरते गोठवल्यानंतर निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटासाठी नवीन चिन्ह व नवीन नावाचे वाटप केले. उद्धव ठाकरे गटाला ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ हे नाव तर ‘धगधगती मशाल’ हे चिन्ह देण्यात आले. शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव व ढाल-तलवार हे चिन्ह देण्यात आले. केवळ अंधेरी पोटनिवडणुकीसाठी दोन्ही गटांना हे चिन्ह व नाव देण्यात आले. मात्र, शिंदे गटाने या निवडणुकीत उमेदवारच उभा केला नाही. त्यावर ठाकरे गटाने टीका करत अंधेरी पोटनिवडणूक शिंदे गटाला लढवायचीच नव्हती तर चिन्ह का गोठवले, असा सवाल निवडणूक आयोगाला केला होता. तसेच, शिवसेना व धनुष्यबाण कोणाचे? या प्रश्नावरुनही सध्या जोरदार वाद सुरू आहे.