मराठ्यांवर लाठीहल्ला : या नेत्याचे वक्तव्य, फडणवीस राजीनामा द्या
-मधुकर पिचड, आर. आर. पाटील यांचे असेच राजीनामे
प्रतिनिधी
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. गोवारींवर लाठीहल्ला झाला नव्हता, तिथे चेंगराचेंगरी झाली होती. या घटनेनंतर त्या खात्याचे मंत्री मधुकर पिचड यांनी ताबडतोब राजीनामा दिला होता. त्यानंतर मुंबईतील घटनेनंतर गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी राजीनामा दिला होता. पूर्वीच्या या दोन उदाहरणांतून फडणवीसानी प्रेरणा घेऊन त्यावर विचार करावा, असे ते म्हणालेत.
दरम्यान शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, एक देश एक निवडणुकीवर चर्चा, विशेष अधिवेशन हे सगळे प्रकार देशातील महत्त्वाच्या मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आहे.
नेमके प्रकरण काय?
जालन्यात मराठा आंदोलकांवर अमानुषपणे लाठीमार करणाऱ्या शिंदे सरकारने आज हात वर केले. लाठीमाराचे आदेश सरकारने दिलेच नव्हते असे सांगत या प्रकरणी पोलिसांना बळीचा बकरा बनवण्यात आले आहे. मराठा समाजाचा संताप टाळण्यासाठी उपमुख्यमंत्री व गृह मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका घेत लाठीमाराबद्दल मराठा समाजाची माफी मागितली. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री असल्याने त्यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी मराठा समाजाचे आंदोलक आणि विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. यावर भाजपकडून जुन्या प्रकरणांचा हवाला देण्याचे काम सुरू झाले आहे. गोवारी समाजाच्या मोर्चादरम्यान झालेल्या दुर्घटनेत 113 जणांचा मृत्यू झाला होता. तेव्हा कोणी राजीनामा दिला नव्हता असा आरोप फडणवीसांनी केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी या आरोपांचा समाचार घेतला.
शरद पवार म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी कोट्यातून आरक्षण दिल्यास ओबीसीमधील गरीब लोकांवर एक प्रकारे अन्याय होईल, असे देखील शरद पवार यांनी म्हटले आहे. त्यामुळे आरक्षणाचा कोटा वाढवण्याची आवश्यकता आहे.
शरद पवार म्हणाले की, मराठा समाजावर झालेल्या लाठीचार्जवर देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली आहे. त्यांनी माफी मागितली म्हणजे आदेश त्यांनीच दिले होते, अशी एका प्रकारे त्यांनी कबुली दिली आहे. त्यांनी आता राजीनामा देण्याची मागणी देखील शरद पवार यांनी केली आहे.


