मध्यरात्रीपर्यंत खल; मंत्र्यांचे खाते वाटप, अजित पवार अचानक निघून गेले

मध्यरात्रीपर्यंत खल; मंत्र्यांचे खाते वाटप, अजित पवार अचानक निघून गेले
– पवारांना अर्थखाते देण्यास विरोध

प्रतिनिधी
मुंबई : मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर खाते वाटपाची चर्चा सध्या जोर धरत आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर कोणाला कोणते खाते मिळणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात रात्री उशिरा तीन तास चर्चा झाली. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार वर्षा बंगल्यावरुन निघाल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात सुमारे दीड तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असला तरी खाते वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. शिवसेनेकडील कोणती खाते राष्ट्रवादीकडे जाणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. यात भाजपच्या मंत्र्यांमध्ये देखील अस्वस्थता आहे. काही भाजपमधील खाती देखील राष्ट्रवादीकडे जाणार असल्याचे माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे खाते वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात तीन तास खलबते झाले.

अजित पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी अर्थ, ग्रामविकास, सामाजिक न्या, ऊर्जा, गृहनिर्माण, महिला व बालविकास आणि अल्पसंख्यक खात्याचा आग्रह धरला आहे. तसेच क्रीडा व शिक्षण पैकी एका खात्यावरही त्यांनी दावा सांगितला आहे. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अजित पवारांना अर्थखाते देण्यास विरोध केल्यामुळे खातेवाटपास विलंब होत असल्याचा दावा केला आहे.