भाजपाच्या या आमदाराने चक्क पोलीस ठाण्यातच पाच राउंड फायर केले
-राजकीय राड्याने राज्यभरात खळबळ
प्रतिनिधी
कल्याण : कल्याण डोंबिवली शहरात पुन्हा राजकीय राडा बघायला मिळतोय. हा राडा इतका भयानक आहे की, ज्याची आपण कधी कल्पना देखील करु शकणार नाही. चक्क पोलीस ठाण्यात गोळीबाराची घडना घडली आहे. विशेष म्हणजे हा गोळीबार गुन्हेगारांकडून नाही तर राजकीय नेत्याकडून करण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात हा सगळा प्रकार घडला आहे. गोळीबाराच्या या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून हा गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर आता शहरातील पोलीसही सतर्क झाले आहेत. या घटनेत शिंदे गटाचे दोन तरुण नेते जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक महेश गायकवाड या घटनेत जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. त्यांना तातडीने उल्हासनगरच्या मीरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आलं आहे. या गोळीबारात महेश गायकवाड यांचे मित्र राहुल पाटील यांनादेखील दोन गोळ्या लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यांच्यावरही रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.
गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी उल्हासनगर हद्दीतील द्वारली गावात जागेच्या वादावरून शिंदे गटातील कार्यकर्ते आणि आमदारांमध्ये वाद झाला होता. त्या जागेवर बांधण्यात आलेली भिंत आज पुन्हा शिंदे गटाकडून पाडण्यात आली. त्यामुळे हा वाद पोलीस ठाण्यात पोहोचला. या वादादरम्यान आमदार गणपत गायकवाड, शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड आणि त्याचा सहकारी राहुल पाटील हे पोलिसांसमोर मत मांडत होते. यावेळी दोन्ही गटात वाद होऊन गोळीबार झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. यावेळी उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या कार्यालयात पाच ते सहा राउंड फायर करण्यात आल्या आहेत.


